अकोला : अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपये हप्ताची लाच उरळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्याने केली होती. या प्रकरणात तब्बल पाच वर्षांनंतर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून आरोपीवर उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून ‘स्पेक्ट्रोग्राफीक’ तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई एसीबीने केली आहे. विजय सुखदेवराव चव्हाण असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

लाचखोर आरोपी चव्हाण उरळ पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये कर्तव्यावर होता. ४ डिसेंबर २०१९ रोजी अवैधरित्या वाळू वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी संजय नामदेवराव कुंभार व विजय सुखदेवराव चव्हाण हे दरमहा २० हजार रुपये हप्ताप्रमाणे लाचेची मागणी करत असल्याची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तत्कालीन पोली निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी ८ डिसेंबर २०१९ रोजी पडताळणी कारवाई केली होती.

दरम्यान कारंजा रमजानपूर गावाजवळ विजय चव्हाण याने तक्रारदारास २० हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. १२ डिसेंबर २०१९ रोजी सापळा रचण्यात आला होता. मात्र, आरोपीला संशय आल्याने त्याने लाच स्विकारली नव्हती. त्यानंतर एसीबीने अमरावती येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत स्पेक्ट्रोग्राफीक तपासणीसाठी नमुने पाठवले होते. त्याचा अहवाल पाच वर्षांनंतर प्राप्त झाला. त्यावरून पोलिसांनी विजय चव्हाण याचे विरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकार, पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या पथकाने केली.

अडीच महिन्यात लाचेचे १७२ गुन्हे राज्यातील विविध शासकीय विभागांना लाचखोरीची कीड लागली आहे. नव्या वर्षातील पहिल्या अडीच महिन्यात १९ मार्चपर्यंत लाच प्रकरणासंदर्भात १७२ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये आरोपींची संख्या २५३ आहे. लाच प्रकरणातील १७० सापळा कारवाईमध्ये २५० आरोपी अडकले आहेत. अपसंपदा प्रकरणात एका गुन्ह्यात दोन आरोपी, तर अन्य भ्रष्टाचार प्रकरणात एक गुन्ह्यात एका आरोपीचा समावेश आहे. सर्वाधिक ३३ गुन्ह्यांची नोंद नाशिक परिक्षेत्रात झाली. मुंबई परिक्षेत्रात १२, ठाणे १६, पुणे ३१, नागपूर २१, अमरावती १७, छत्रपती संभाजीनगर २९ आणि नांदेड परिक्षेत्रात १३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Story img Loader