वर्धा : विदेशात शिक्षण घेण्याची अनेकांना ओढ असते. उच्च शिक्षणासाठी नामवंत जागतिक विद्यापीठात भारतीय विद्यार्थी प्रवेश मिळावा म्हणून खटाटोप करतात, तर केंद्र व राज्य शासनपण त्यासाठी विविध योजना राबवितात. म्हणून दरवर्षी ही संख्या वाढत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ या वर्षात १० लाख ३० हजार विद्यार्थी विविध देशात शिकत होते. आज भारतीय विद्यार्थी जगातील ७९ देशांत विविध शाखांचे शिक्षण घेत आहे. मात्र पाच देशांना सर्वाधिक पसंती दिल्या जाते.
अमेरिका : सर्वाधिक प्राधान्य असलेला देश अमेरिका होय. प्रसिद्ध विद्यापीठे, संशोधन संधी, लवचिक अभ्यासक्रम, करीयरच्या वाटा या अमेरिकेतील बाबी आकर्षित करतात.
हेही वाचा – ‘नाहीतर तो व्हिडीओ..’, तरुणीला धमकी देत दोघांनी शरीर सुखाची केली मागणी
कॅनडा : दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचा शेजारी असलेला कॅनडा आहे. प्रमुख कारण म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना इथे फार खटाटोप न करता सहज प्रवेश मिळतो. येथील विद्यापीठ पदव्यांना सर्वत्र मान्यता आहे. इतर देशांच्या तुलनेत येथील शिक्षणावरील खर्च कमी आहे. इथे पदवी घेतलेल्या युवकांना कॅनडातील काही भागांत सवलती मिळतात.
संयुक्त अरब अमिरात : केवळ भारतच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. मोठा बिझनेस हब असल्याने मुलं आकर्षित होतात. सुरक्षितता आहे. दळणवळणाच्या सोयी सुविधा आहेत. कामगार कायदे लवचिक आहेत. परिणामी शिक्षण घेत असतानाच नौकरीपण करता येते.
हेही वाचा – पर्जन्यमान : कसा असेल पावसाळी वातावरणाचा मुक्काम? जाणून घ्या…
ऑस्ट्रेलिया : आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली शिक्षण प्रणाली, सुसज्ज विद्यापीठे आणि शिक्षणानंतर मिळणारी नौकरीची संधी यामुळे हा देश विद्यार्थ्यांच्या पसंतीचा देश ठरला आहे. आस्ट्रेलियन सरकारकडून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्या जाते. म्हणून विशेष शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. तसेच आर्थिक मदतपण केल्या जाते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आहेत.
सौदी अरेबिया : या देशातील सार्वजनिक विद्यापीठाकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. संशोधनसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिल्या जातो. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या आदर्श अशी आहे. येथील विद्यापीठांचे जागतिक क्रमवारीत असलेले वरचे स्थान, सुविधायुक्त प्रयोगशाळा तसेच ग्रंथालये हे येथील वैशिष्ट्य आहे. प्रवेश घेण्यासाठी सर्व ती मदत व मार्गदर्शन मिळते. निवास, वाहतूक तसेच अपेक्षित गरजांसाठी तत्पर मदत उपलब्ध असते.