यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील देवधरी गावात विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे १०० पेक्षा अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली. आज, मंगळवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून, बाधित नागरिकांना पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा- गडचिरोली : सूरजागड लोहखाणीतील ट्रक चालकाचा आदिवासी महिलेवर बलात्कार; आरोपीस अटक
ग्राम पंचायतीचा गावात ‘फिल्टर प्लांट’ आहे, मात्र तो बंद असल्याने गावकऱ्यांना विहिरीतील पाणी प्यावे लागते. २००० साली गावात नळ योजनाही कार्यान्वित झाली, परंतु ही योजनाही आजपर्यंत प्रत्यक्षात अंमलात आली नाही. त्यामुळेच विहिरीतील दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या गावात मानव मिशन अंतर्गत नवीन नळ योजनेचे काम सुरू आहे. दरम्यान, अतिसाराची लागण झाल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी व चमू गावात दाखल झाली असून, विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.