नागपूर : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या बसोली ग्रुप, स्कूल ऑफ स्कॉलर्स, वि. सा. संघ, नागपूर आयोजित स्व. मनोहर म्हैसाळकर स्मृती वैदर्भीय काव्य नक्षत्रमालेत १५० पेक्षा अधिक बालचित्रकारांनी वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला साकारली. यात विदर्भातील विविध कवींच्या कविता दृश्यरुपात प्रकट झाल्या.
वैद्यर्भीय काव्य नक्षत्रमाला या दृश्यचित्र प्रकल्पाचे उद्घाटन सकाळी १० वाजता मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बसोलीचे चंद्रकांत चन्ने व त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या उपक्रमात विदर्भातील ३० निवडक कवींच्या कविता निवडण्यात आल्या होत्या.
कवी सुरेश भट, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, विठ्ठल वाघ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कवी अनिल, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राम शेवाळकर आणि प्रफुल्ल शिलेदार, संजय तिगावकर आदींच्या कवितांचा समावेश होता. बसोलीच्या १५० बालचित्रकारांनी ३० वेगवेगळ्या कॅनव्हासवर सामूहिकपणे या कवितांचे दृश्य स्वरूप रसिकांसमोर रंग आणि रेषेच्या माध्यमातून सादर केले. ही बालचित्रकार मंडळी विदर्भातील विविध शाळेतील बसोलीचे सदस्य असून ५ ते ९ या वर्गातील आहेत. प्रत्येक गटाला “नक्षत्र आणि तारे” यांची नावे देण्यात आली आहे. ४ बाय ४ च्या मोठ्या कॅनव्हासवर ॲक्रलिक रंग माध्यामातून हे कविताचित्र साकारण्यात आले.