अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत १४ व्या हप्त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे. अद्यापही २२ हजारहून अधिक लाभार्थ्यांचे ‘ई- केवायसी’ पूर्ण नसल्याने त्यांना लाभ मिळू शकला नाही. नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे.
पीएम किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांचे ‘ई-केवायसी’, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे बंधनकारक आहेत. ते पूर्ण न करणारे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. कृषी विभागामार्फत नुकतीच याबाबत मोहिमही राबविण्यात आली. अद्यापही अकोला जिल्ह्यात २२ हजार १४० लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ व १२ हजार ७४१ लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
विभागाकडून वारंवार सर्वंकष प्रयत्न करून देखील ‘ई-केवायसी’ व बँक खाते आधार संलग्नीकरणासाठी प्रतिसाद न देणाऱ्या लाभार्थ्यांना पोर्टलवरून वगळण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. पीएम किसान योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांनी ‘ई-केवायसी’ व बँक खाते आधार संलग्नीकरण १० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिसाद न दिल्यास लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याची कार्यवाही होईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांनी ई- केवायसी व बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यापुढे ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास नाव वगळण्यात येणार आहे. – शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.