‘मेट्रोपॉलिटन सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर शहरात जल्लोषासाठी कारणच हवे असते. मग क्रिकेटमधला विजय असो वा होळीची धुळवड, कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला तरीही नागपूरकर जल्लोष करणार हे ठरलेलेच आहे. यंदा संपूर्ण राज्यात जलसंकट असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोरडी होळी साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, नागपूरकर मुख्यमंत्री असूनसुद्धा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता धुळवडीला तब्बल २५ दशलक्ष घन लिटर पाणी नागपूरकरांनी वाया घालवले.
धुळवडीला नागपूर शहरात मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. मात्र, संपूर्ण राज्यातच यावर्षी गहिरे जलसंकट असल्यामुळे सर्वच स्तरातून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन केले जात होते. नागपूरकर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नागपूर महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनी यांनीसुद्धा शहर बसस्थानके, पाण्याचे टँकर यावर फलके लावून ‘पाणी वाया घालवू नका’ असे आवाहन केले. या आवाहनाला न जुमानता लाखो लिटर पाणी धुळवडीत नागपूरकरांनी वाया घालवले. नागपूर शहराची लोकसंख्या किमान २५ लाख आहे. यातली सुमारे १/५ लोकसंख्या म्हणजेच पाच लाख नागपूरकर धुळवड साजरी करतात. होळीचा रंग तयार करण्यासाठी एक व्यक्ती किमान एक बादली म्हणजेच १० ते १५ लिटर पाणी वापरले जाते. म्हणजेच ही पाच लाख लोकसंख्या तब्बल ५० लाख लिटर पाणी केवळ होळीचा रंग तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर अंगावर पडलेला हा होळीचा रंग काढण्यासाठी एका व्यक्तीला २० लिटर याप्रमाणे पाच लाख लोकांना १०० लाख लिटर पाणी लागते. धुळवडीसाठी जेवढे पाणी वाया घालवले जाते, तेवढेच पाणी धुळवडीमुळे खराब होणारी वाहने धुण्यासाठी वापरले जाते. किमान २० हजार नागरिकांची वाहने धुळवडीमुळे खराब होतात. एका वाहनाला ५० लिटर याप्रमाणे लहा लाख लिटर पाणी केवळ वाहने धुण्यासाठी वापरले जाते. धुळवडीच्या निमित्ताने शहरात फेरफटका मारल्यानंतर हे समीकरण प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले. एकीकडे नागपुरात पाण्याचा असा खेळ सुरू असताना खामला व्यापारी संघाने मात्र मुख्यमंत्री आणि नागपूर महापालिका तसेच ऑरेंज सिटी वॉटरच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यांनी फुलांची होळी खेळत पाण्याविना होळी खेळली जाऊ शकते, याचा उत्तम पाठ घालून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा