यवतमाळ : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातील ३६ हजार १३९  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात यावेळी अकरावीसह आयटीआय, तंत्रनिकेतन आदींसाठी ४६ हजारांवर जागा आहेत. जागा अधिक आणि विद्यार्थीसंख्या कमी असे चित्र असल्याने अकरावी व कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अडचण येणार नसल्याचे दिसते.  दहावीचा निकाल लागला तरी अजून गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळायच्या आहेत. जिल्ह्यातील ३४९ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ३ जूनपासून सुरु होणार आहे. शिक्षण विभागाने तशा सूचना गुरूवारी निर्गमित केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 पॉलटेक्निक आणि आयटीआयची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनुसार होणार आहे. जिल्ह्यात कला, विज्ञान, वाणिज्य या  विद्याशाखांमध्ये अकरावीसाठी ३४९ महाविद्यालयांमध्ये ३५ हजार ५२० जागा उपलब्ध आहेत. त्यात कला शाखेत १८ हजार ९००, विज्ञान शाखेत १३ हजार ७६०,  वाणिज्य शाखेत दोन हजार ८६०, व्यवसाय अभ्यासक्रम दोन हजार २४०, अकाउंटिंग  २४० तर ऑनिमल हसबंडरी अभ्यासक्रमासाठी २०० जागा आहेत.

हेही वाचा >>>एका लाखाच्या मोबदल्यात चार लाख! फेसबुकवर जाहिरात पाहिली अन् चप्पल विक्रेता…

त्यासोबतच जिल्ह्यातील तीन तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ८१० जागा आहेत. गेल्या वर्षी तंत्रनिकेतनच्या या जागांसाठी मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यात १८ शासकीय आणि चार अशासकीय अशा २२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. येथे विविध ट्रेडसाठी चार हजार ५१६ जागा आहेत.  

सध्या विद्यार्थी व पालकांचा कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे कल आहे. शहरी विद्यार्थी दहावीनंर विज्ञान शाखा घेवून जेईईई, सीईटी, नीट या अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी खासगी शिकवणी वर्गांकडे गर्दी करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी पॉलटेक्निक, आयटीआय या रोजगाराभिमूख अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>नागपुरात गडकरींनी अनेक उड्डाणपूल बांधले, पण शहराच्या हृदयस्थानी एक चूक…

असे आहे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

अकरावी प्रवेश प्रक्रिया ३ जूनपासून सुरू करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले. शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत यांनी गुरुवारी संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेचे  वेळापत्रक जाहीर केले. ३ जूनपासून विद्यर्थ्यांना अकरावी प्रवेशाचे अर्ज महाविद्यालयांमधून घेता येणार आहे. प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ६ जून आहे. ७ जूनपर्यंत अर्जाची छाननी होऊन ८ जून रोजी गुणवत्ता यादी झळकणार आहे. १० ते १२ जून या तीन दिवसांत प्रत्यक्ष प्रवेश

निश्चित करून दिले जाणार आहेत. रिक्त राहणाऱ्या जागांसाठी १३ जूनला पहिली व १८ जूनला दुसरी प्रतीक्षा यादी लावून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

खासगी शिकवणी वर्गांचे महाविद्यालयांशी ‘टायअप’

शहरी विद्यार्थी अकरावी, बारावीसाठी महाविद्यालयात जाण्याऐवजी पूर्णवेळ खासगी शिकवणी वर्गासाठी देतो. त्यामुळे बहुतांश खासगी शिकवणी वर्गांनी विविध कनिष्ठ महाविद्यालयांशी टायअप केले आहे. या शिकवणी वर्गात प्रवेश घेतला की, नाममात्र पाच ते दहा हजार रूपये वार्षिक शुल्क भरून अकरावीत प्रवेश दिला जातो. अशा महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना केवळ प्रात्यक्षिक व वार्षिक परीक्षेसाठी जावे लागते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 43 thousand seats for 11th admission yavatmal nrp 78 amy