चंद्रपूर: उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण मंजूर १२३ पदांपैकी केवळ ६१ पदे नियमित भरलेली आहेत. ३१ कंत्राटी डॉक्टरांची सेवा घेवून रूग्णांची मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे अपघातात गंभीर जखमी, गंभीर रूग्णांना आजही रेफर टू चंद्रपूर पाठविले जात आहे. चिमूर, वरोरा, राजुरा व ब्रम्हपुरी हे चार शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सोडले तर ग्रामीण रुग्णालयात एकाही ठिकाणी डॉक्टरांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अंतर्गत या जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये ग्रामीण रूग्णालय आहे. या सर्व ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२३ पदे मंजूर आहेत. मात्र या मंजूर पदांपैकी केवळ ६१ पदे भरलेली आहेत. उवरीत ६२ म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा अधिक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपुरात वैद्यकीय सेवेची ही अवस्था आहे. चिमूर ग्रामीण रूग्णालयात १२ पदे मंजूर आहेत, ही सर्व पदे भरलेली आहेत. वरोरा रूग्णालयात १२ पदे मंजूर असून तिथे ११ पदे भरलेली आहेत. राजुरा येथे सहा मंजूर पदांपैकी सर्व सहा पदे भरली आहेत. ब्रम्हपुरी येथेही डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आलेली आहेत. मात्र नागभीड व सिंदेवाही या दोन रूग्णालयाचा कारभार कंत्राटी डॉक्टरांच्या भरोशावर सुरू आहे. हिच अवस्था सावली ग्रामीण रूग्णालयाची आहे. येथेही डॉक्टर नसल्याने वैद्यकीय सेवेचे तीन तेरा वाजले आहे. गोंडपिंपरी येथे एकूण तीन पदे मंजूर आहेत. मात्र तिथेही केवळ एका कंत्राटी डॉक्टरच्या भरोशावर कारभार सुरू आहे. बल्लारपूर या सर्वात मोठ्या तालुक्यातील रूग्णालयात मंजूर तीन पदांपैकी एक स्थायी वैद्यकीय अधिकारी आहे तर दोन कंत्राटी डॉक्टर आहेत.
कोरपना, पोंभूर्णा व जिवती या तीन तालुक्यात तर कायम वैद्यकीय अधिकारी सेवा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयाचा कारभार कंत्राटींच्या सेवेवर सुरू आहे. मूल येथे केवळ एक कायम वैद्यकीय अधिकारी आहे. उर्वरीत पदे कंत्राटी डॉक्टरांनी भरलेली आहेत. सूत्रांनी मूल ग्रामीण रूग्णालयात पती पत्नी वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. त्यातील पतीची इतरत्र बदली झाली. त्यानंतर पत्नीचीही बदली झाली. मात्र पत्नीला अजूनही झाली तिथे पाठविण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे पालकमंत्रीच स्वत: पत्नीला लवकर मोकळे करा यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करित असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. गडचांदूर येथेही वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहेत. मात्र तिथेही कंत्राटी डॉक्टर कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांचेशी संपर्क साधला असता, ग्रामीण भागात डॉक्टरांची ५० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती दिली.