नागपूर : शहरातील जवळपास अर्धेअधिक वाहतूक सिग्नल बंद आहेत. तसेच अनेक चौकांतील सीसीटीव्हीसुद्धा बंद आहेत. त्यामुळे अनेक चौकांत वाहनांची कोंडी होत आहे. मात्र, वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसतात.
पावसामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे शहरातील अर्धेअधिक वाहतूक सिग्नल बंद आहेत. ही समस्या सोडवण्याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून चौकात सिग्नल लावण्यात आले आहेत. परंतु, पावसामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा नादुरुस्त झाली. यात वर्दळीच्या चौकांतील सिग्नलचा समावेश आहे. यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. शहरात दररोज नवीन वाहनांची भर पडत असून बाहेरून नागपुरात येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. तुकडोजी चौक, इंदोरा चौक, रहाटे कॉलनी, पंचशील चौक, सदर चौक, माटे चौक, अंबाझरी टी पॉईंट, जाधव चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, क्रीडा चौक, बैद्यनाथ चौक, शताब्दी चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल बंद असतात. ते दुरुस्तही केले जात नाही. सकाळी कार्यालयात जाण्याच्या व परत येण्याच्या वेळी रस्त्यावर गर्दी होते. अशावेळी सिग्नल बंद राहात असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
वाहतूक पोलिसांची वानवा
शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत जवळपास ८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. दिवसेंदिवस विस्तारित होत असलेल्या शहरात रोज नव्या वाहनांची भर पडत आहे. शहरात एकूण १६५ वाहतूक सिग्नल असून प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करणे शक्य नाही. शहराचा विस्तार बघता आणखी ६०० ते ७०० वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे.
चौकातील नादुरुस्त सिग्नल दुरुस्तीसाठी महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करतात. सिग्नल बंद असल्यानंतर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. – विनोद चौधरी, प्र. सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.
हेही वाचा – शरद पवारांचे मिशन गोंदिया! प्रफुल्ल पटेलांविरोधात रणनिती २८ जुलैला उलगडणार
दुरुस्तीचे काम सुरू आहे
पावसाळ्यामुळे सिग्नलच्या विद्युत यंत्रणेत बिघाड होतो. त्यामुळे काही ठिकाणी सिग्नल बंद पडले आहेत. दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सिग्नलवर आडव्या आलेल्या झाडाच्या फांद्या कापण्याचे कामही सुरू आहे, असे महापालिकेच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.