नागपूर : सूर्याचा प्रकोप कायम असल्याने उष्णतेची लाट अधिक तापदायक ठरत आहे. विदर्भात दररोज नवनवे विक्रम नोंदवले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये  ४७ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिकची नोंद झाली. तर गुरुवारी ब्रम्हपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची उच्चांकी नोंद करण्यात आली. एवढेच नाही तर विदर्भातील अर्ध्याहून अधिक शहरांमध्ये तापमान ४४, ४५ अंश सेल्सिअस पार गेले आहे. दरम्यान हवामान खात्याने आज, शुक्रवारी देखील विदर्भात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवतपामध्ये विदर्भ चांगलाच तापलाय आणि राज्याच्या इतर भागातही उन्हाच्या झळा कायम आहेत. ब्रम्हपुरी शहरात आतापर्यंत तीन ते चारवेळा उच्चांकी तापमानाची नोंद झाली तर यवतमाळ येथेही या वर्षातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. त्यापाठोपाठ अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा या शहरांमध्येही तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जात आहेत. काही शहरांमध्ये ४४ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कायमच आहे. हवामान खात्याने आज विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान, शनिवार एक जूनपासून तर तीन जूनपर्यंत विदर्भासह राज्यातील खानदेश, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यने ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याचे घोषित केले. पूर्वअंदाजानुसार मोसमी पाऊस केरळमध्ये ३१ मे रोजी दाखल होणार होता. मात्र, २४ तासांपूर्वीच तो केरळमध्ये दाखल झाला.

हेही वाचा >>>भाजपच्या दोन गटात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार; बिहारच्या राजकारणात शोभेल असा प्रकार महाराष्ट्रात…

त्यामुळे महाराष्ट्रातील मोसमी पावसाच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे. यावर्षी बाराही महिने अवकाळी पाऊस कायम असला तरी शेतकऱ्यांसाठी मोसमी पाऊस महत्त्वाचा असतो. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच अधिक केले. मोसमी पावसाने केरळ या राज्यासोबतच देशाच्या पुर्वोत्तर भागातील सात राज्यात देखील प्रवेश केला आहे. मोसमी पाऊस केरळ राज्याच्या सीमेवर सक्रिय झाल्यानंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्विप भागापर्यंत त्याने मजल मारली आहे. त्यामुळे राज्यातही तो नियोजित वेळेपेक्षा लवकरच दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तोपर्यंत मात्र उन्हाच्या झळा आणि उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणे शक्य नाही. आज, शुक्रवारी उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than half of vidarbha cities recorded temperatures of 44 45 degrees celsius rgc 76 amy
Show comments