अविष्कार देशमुख

गरज असलेल्या भागांकडे दुर्लक्ष

पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी वॉटर एटीएम सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणी (मिनरल) पुरवठा करण्यासाठी शहरात वॉटर एटीएमचा पर्याय पुढे आला आहे. ज्या भागात खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे,अशा ठिकाणी ही वॉटर एटीएम लावणे अपेक्षित होते. परंतु पंधरापैकी निम्मे वॉटर एटीएम मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात लावण्यात आले आहे. त्यामुळे गरज असलेल्या वस्त्यांना परत एकदा शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजना मोजक्याच भागात सुरू आहे. नळाला दोनच तास पाणी येते. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे.

तेथे केवळ टँकरने पाणीपुरवठा होतो. अशा भागात खऱ्या अर्थाने वॉटर एटीएमची गरज आहे. मात्र दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये  पंधरापैकी दहा वॉटर एटीएम लावण्यात आले आहे. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडण़वीस यांचा मतदारसंघ आहे हे विशेष.

सर्व वॉटर एटीएम सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) लावण्यात आली आहेत. दक्षिण पश्चिम नागपुरात पाणीटंचाई नाही. पूर्व नागपुरातील दिघोरी, वाठोडा येथे दररोज टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागतो. त्या भागातील अनेक वस्त्यांमध्ये जलवाहिनी देखील नाही. अशात या ठिकाणी वॉटर एटीएमची गरज आहे.  कळमना, नारा, झिंगाबाई टाकळी, नरसाळा, हिवरीनगर, डेप्टीसिग्नल या भागात दाट आणि छोटय़ा वस्त्या आहेत. या भागात वॉटर एटीएमची आवश्यकता आहे.

येथे गरज

वाठोडा, दाभा, नरसाळा, मानेवाडा, दिघोरी, हिवरीनगर, डेप्टीसिग्नल, कळमना, इंदोरा, नवीन सुभेदार, छोटा ताजबाग, मोमीनपुरा.

येथे आहे वॉटर एटीएम

जयतळा बाजार, एकात्मतानगर, नरेंद्रनगर, भगवाननगर, चुनभट्टी, सोमलवाडा, खामला जुनीवस्ती, मनीषनगर, सोनेगाव वस्ती, त्रिमूर्तीनगर.