निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांचा जल्लोष
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करीत परीक्षकांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
लोकसत्ता लोकांकिकेचे यंदा पाचवे वर्ष असून मोजक्याच पण, फार मेहनत आणि ताकदीने स्पर्धेत उतरलेल्या एकांकिका एकापेक्षा एक सरस होत्या. संगीत, नेपथ्याचे वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांनी केले. त्याला प्रेक्षकांकडूनही चांगली दादही मिळाली. बऱ्याच कथानकांमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी जीव ओतून मेहनत घेतली. ‘इंक- क्रेडिएबल फेसऑफ’या पहिल्याच एकांकिकेत भय, भाव आणि रहस्य एकत्रच दडलेले दिसूनआले. सकस कथाबीज असल्याने शेवटपर्यंत या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. रहस्य कथेबरोबरच वास्तववादी चित्र मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या ‘गटार’ या एकांकिकेत करण्यात आला.
‘गटार’मध्ये नेपथ्य उत्कृष्ट होते. गटार साफ करणाऱ्यांचे जगण्याचे प्रश्न चपखलपणे मांडण्यात आले होते. त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता आणि जातीयतेचे चटके यांच्यामुळे त्यांची होणारी पिछेहाट. त्याचवेळी पुढील पिढीमध्ये शिक्षणामुळे पुढे जाण्याची असलेली ऊर्मी लेखक वीरेंद्र गणवीर यांनी संहितेत उतरवली आणि त्याला कलाकारांनी न्याय दिला.
सोमवारी सादर झालेल्या नाटकांमध्ये नवप्रतिभा कला वाणिज्य महाविद्यालयाची ‘घायाळ पाखरा’या एकांकिकेतील बहुविकलांगत्व असलेला मुलगा आणि त्याच्या आईच्या अभिनयाने सर्वानाच हेलावून सोडले. याची दखल मुंबईच्या ‘आयरीश प्रॉडक्शन टॅलेंट हंट’ लोकांकिकेतील ‘को पार्टनर’ यांनी विशेषत्वाने घेतली. अपंगांचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. त्यांना आजही बाजूला केले जाते. त्यांचा आदर तर दूरच पण शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याच्या अपंगत्वाची जाणीव करून देऊन त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न सातत्याने होतो, हे रोहीत वानखेडे आणि साची तेलंग यांच्या अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. याला ओमप्रकाश लांजेवार यांचे दिग्दर्शन लाभले.
‘बाकी सर्व ठीक आहे’ या धनंजय मांडवकर लिखित एकांकिकेने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. कवी ‘लोकनाथ यशवंत’ यांच्या कवितांवर आधारित कथा तयार करून त्याचे नाटय़ रूपांतर करण्याचे अवघड काम लेखकाने केले. आदित्य बुलकुंदे आणि पूनम बुलकुंदे या भावाबहिणींसह सौरभ फुलझेले यांनी ही एकांकिका सादर केली. याचीही दखल आयरिश प्रॉडक्शनने घेतली. शोषक आणि शोषित यांच्यातील वास्तव, संगीताच्या तालावर दाखवण्याचे एक अनोखी कसब यात दिसून आली.
‘‘दोन दिवसांमध्ये चांगल्या एकांकिका सादर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. तरीही सादरीकरणाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला हवे. त्यांना पुढे जाण्यास उत्तम व्यासपीठ मिळावे म्हणून ‘लोकसत्ता’ प्रयत्न करीत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करावा. नवीन काही करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. सुधारणेला भरपूर वाव असतो. लेखकाला जे सांगायचे आहे. ते पाहणाऱ्यांना कलावंतांच्या अभिनयातून समजायला हवे. २०१८मध्ये लोकसत्ताला महाविद्यालयीन तरुणाईला हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावेसे वाटले. मुळात त्यांना स्पर्धामध्ये भर घायलायची नाही तर मुलांच्या अंगभूत गुणांना वाव द्यायचा आहे. ’’
– विश्वास सोहनी, परीक्षक, लोकांकिका, नागपूर</p>
प्रायोजक
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, के सरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहात आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ हे न्यूज पार्टनर आहेत.