नागपूर : महावितरणकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ लाख ७० हजार कृषी पंपांना वीज जोडणीची सर्वोत्तम कामगिरी केल्याचा दावा होत आहे. परंतु, राज्यात अद्यापही १ लाख ६ हजार ३४० शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरल्यानंतर कृषीपंपासाठी प्रत्यक्ष जोडणी मिळण्यास विलंब होतो, त्याला ‘पेड पेंडिंग’ म्हणतात. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महावितरणने कृषीपंपांना वीज जोडणी देण्याला गती दिली. त्यानुसार १.७० लाख शेतकऱ्यांना वर्षभरात जोडणी दिली गेली. आता राज्यातील प्रतीक्षा यादी १.०६ लाखांवर आली आहे.

हेही वाचा – नागपूर : अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये नेऊन बलात्कार

महावितरणने यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात ९६ हजार ३२७ शेतकऱ्यांना, २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख १७ हजार ३०४ आणि २०२१ -२२ या आर्थिक वर्षात एक लाख ४५ हजार ८६७ शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी दिली आहे. यापूर्वी २०१९ -२० या आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्यात प्रलंबित वीज जोडणीची संख्या १ लाख ६७ हजार ३८३, २०२० -२१ मध्ये १ लाख ८४ हजार ६१३ आणि २०२१ -२२ मध्ये १ लाख ८० हजार १०४ इतकी होती, हे विशेष.

सौरपंप/उच्चदाब प्रणालीतून केवळ ११ हजार जोडणी

महावितरणने २०२२-२३ या आर्थिक वर्षात दिलेल्या १ लाख ७० हजार जोडणीपैकी १ लाख ५९ हजार जोडण्या या पारंपरिक पद्धतीने दिल्या आहे. तर सौरपंप किंवा उच्चदाब वितरण प्रणाली या विशेष योजनांतून ११ हजार जोडण्या दिल्या आहे. यापूर्वीच्या वर्षी दिलेल्या १ लाख ४५ हजार ८६७ कृषीपंप जोडणीपैकी ४६ हजार १७५ जोडण्या या सौर किंवा उच्च वीजदाब प्रणालीतील होत्या.

हेही वाचा – “…तर उर्वरित पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी?”, छगन भुजबळ यांचा सवाल

शासनाकडून ८०० कोटींचा निधी

शेतकऱ्यांना कृषीपंपाची वीज जोडणी देण्यासाठी राज्य शासनाने ८०० कोटींचा निधी दिला तर महावितरणने स्वतःचा २४१ कोटी रुपये निधी खर्च केला आहे. याखेरीज शेतकऱ्यांच्या वीजदेयक वसुलीतून मिळालेला पैसाही कृषीपंपांना जोडणी देण्यासाठी वापरण्यात आला, असे मुंबई, मुख्य जनसंपर्क अधिकारी, अनिल कांबळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than one lakh farmers awaiting power connection for agricultural pumps mahavitran claims to have given the highest number of connections mnb 82 ssb