लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदार संघात गेल्या तीन दिवसात दहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी केला. उन्हाच्या तीव्रतेमुळे दोन सख्या बहिणींना जीव गमवावा लागला, मात्र या उष्माघाताच्या मृत्यूंची नोंद जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य विभागाने घेतली नाही, याबाबत धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे दोन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला. २९ मे रोजी अहिम शेख (३०) व नानाजी चहारे (९०) या दोघांचा मृत्यु झाला, तर २८ मे रोजी महादेव वासेकर, अंबादास धोटे, चंद्रभागा सोनटक्के व संजय मांदाळे या चौघांचा मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे सुंदराबाई कोडापे (७०) व गोंडीनबाई आत्राम (७५) या दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला. गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथे दोघांचा व धानापूर येथे एकाचा मृत्यू उष्माघाताने झाला. या मृत्यूंची नोंद जिल्हा प्रशासनाने अथवा आरोग्य विभागाने घेतली नाही, असा आरोप धोटे यांनी केला आहे.

आणखी वाचा-७२ वर्षात फक्त एकानेच साधली नागपूर लोकसभेत हॅट्रिक, कोण आहेत ते?

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव चिंचोले यांना विचारणा केली असता, आरोग्य विभागाच्या ‘पोर्टल’वर उष्माघाताची नोंद नाही. मात्र काही दिवसांपूर्वी भद्रावती, सावली व नागभीड येथे झालेल्या मृत्यूंमध्ये उष्माघाताचा संशय व्यक्त होत आहे, असे त्यांनी सांगितले.

सिंदेवाही येथे अरुण रंदये (४९) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. वरोरा येथील कुणाल उर्फ संकेत मडावी या तरुणाने जेवणानंतर पाणी पिले. त्यानंतर लगेच प्रकृती खालावून कुणालचा मृत्यू झाला. हा प्रकारही उष्माघाताचाच असल्याची चर्चा आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील वयोवृद्धाचा तर धाबा येथील रवी बोन्डकू चौधरी व शांताबाई उसन्ना संदेलवार (७०) या दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than ten victims of heat stroke in three days allegation of former mla sanjay dhote rsj 74 mrj
Show comments