लोकसत्ता टीम
नागपूर: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान धावणारी आणखी एक रेल्वेगाडी लवकरच मिळणार आहे. नागपूर-शहडोल दरम्यान ८ ऑक्टोबर पासून नवीन रेल्वेगाडी सुरु होत आहे.
११२०१/११२०२ नागपूर-शहडोल-नागपूर एक्सप्रेस नागपूरहून-दररोज सकाळी ८ वाजता निघेल. आणि शहडोल येथे त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. तर शहडोल येथून दररोज पहाटे ५ वाजता निघेल आणि नागपूरला त्याच दिवशी सांयकाळी ६ वाजता येईल. ही गाडी नागपूर, सौसर, छिंदवाडा, सिवनी, नैनपूर, जबलपूर, कटनी दक्षिण, उमरिया येथे थांबणार आहे.
आणखी वाचा-अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची टॉवर वर चढून ‘गांधीगिरी’
या गाडीमुळे नागपूर, छिंदवाडा, सिवनी जबलपूर, कटनी, उमरिया, शहडोल जिल्ह्यांतील संपर्क सुधारेल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकारी यांनी व्यक्त केला. दरम्यान, काल, गुरुवारी (५ ऑक्टोबरला) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शहडोल येथे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन गाडीला रवाना केले.