अमरावती : बेलोरा येथील विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडत गेले. बेलोरा येथील विमानतळावर १३०० मीटरची धावपट्टी होती. एटीआर-७२ सारख्या विमानांना उतरणे सोयीचे व्हावे, यासाठी ही धावपट्टी १८५० मीटरपर्यंत वाढवण्याचे नियोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) केले होते. हे काम आता पूर्णत्वास जात आहे. दुसरीकडे, टर्मिनल बिल्डिंगची उभारणी देखील अंतिम टप्प्यात आहे. या मुख्य इमारतीचे काम एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमएडीसीचा प्रयत्न आहे.
विमानतळाची धावपट्टी ही १९९२ मध्ये उभारण्यात आली होती. सध्या या धावपट्टीचा वापर केवळ खासगी विमानांसाठी होतो. राज्य सरकारने २००९ मध्ये एमएडीसीला बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्त केले होते आणि २८० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली होती. पण, हे काम रखडले. २०१७ मध्ये विमानतळाचा ताबा पुन्हा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्याकडे देण्यात आला. मध्यंतरीच्या काळात धावपट्टीचा विस्तृत आरखडा तयार करण्यात आला. शेवटच्या टप्प्यात एटीआर-७२ प्रकारातील विमानाचे उड्डाण करण्यासाठी रात्रकालीन विमान उड्डाणाच्या सुविधेसह धावपट्टीची लांबी १३७२ मीटरवरून १८५० मीटपर्यंत वाढवणे व इतर कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. १३ जुलै २०१९ रोजी विस्तारीकरणाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातदेखील करण्यात आली होती. परंतु हे काम शेवटच्या टप्प्यात पुन्हा रखडले.
विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी शासन स्तरावरील अनास्था बघता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान एप्रिल २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले होते. आता एप्रिलपर्यंत कामे पूर्ण झाली तरी, लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मार्चपासून मुंबई-अमरावती विमानसेवा?
अमरावती विमानतळावरून मार्च २०२४ पासून इंडिगो कंपनीची ७२ आसनी एटीआर मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी खासदार राणा यांनी विमानतळाची पाहणी केली. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावे, अशी विनंती खासदार राणा करणार आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – ७ फेब्रुवारीला चंद्रपुरात महामोर्चा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी
विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एप्रिलपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानसेवेसाठी अलायन्स एअर या कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. इंडिगो कंपनीच्या सेवेबद्दल निर्णयाची माहिती नाही. – गौरव उपश्याम, विमानतळ व्यवस्थापक, अमरावती.