लोकसत्ता टीम
नागपूर : ‘मॉर्निंग वॉक’ करताना पाऊस अनेकदा वाट अडवतो. छत्री घेऊन जाणाऱ्यांनादेखील ते कठीण होते. मात्र, तोच पावसाळा संपला की हिरवळीतून ‘मॉर्निंग वॉक’ करण्याची मजाच काही वेगळी असते. जंगलातून जाणाऱ्या हिरवळीच्या वाटेवर आणि समोर धुक्याची चादर पसरली असताना अचानक वाघांचा ‘मॉर्निंग वॉक’ सुरू झाला तर..!
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे जेवढा पर्यटकांचा ओढा आहे, तेवढाच तो पेंच व्याघ्रप्रकल्पाकडे देखील. ताडोबात व्याघ्रदर्शन नाही झाले तर पर्यटक हिरमुसतात, पण पेंच व्याघ्रप्रकल्पात तसे नाही. व्याघ्रदर्शन नाही झाले तरी पेंचचे जंगल मात्र पर्यटकांना मोहात पाडणारे आहे. इथला निसर्ग, निसर्गातील प्रत्येक घटक पर्यटकांना पुन्हा येण्यासाठी प्रवृत्त करतो. पावसाने नुकतीच विदर्भातून पूर्णपणे माघार घेतली आहे. अवकाळी पावसाच्या सरीही अधूनमधून कोसळत आहेत. मात्र, त्याचवेळी हिवाळ्याची चाहूल देणारे वातावरणही तयार होत आहे. सायंकाळपासून तर पहाटेपर्यंत वातावरणात थंडगार वाऱ्याची झुळूक जाणवते. अधूनमधून धुक्याची चादर देखील पसरलेली दिसून येते. मात्र, धुके खऱ्या अर्थाने अनुभवायचे असेल तर ते जंगलातच.
आणखी वाचा-महिला वकिलाची वेगळीच मागणी… याचिका पाहून उच्च न्यायालय म्हणाले…
राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प विदर्भात आणि त्यातही पेंच आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प निसर्गसौंदर्याच्या बाबतीत इतर जंगलांना मागे टाकणारे. याठिकाणी हिवाळ्यात जाणे म्हणजे निसर्गसौंदर्याची अप्रतिम अनुभूती. पावसाळ्यानंतर पेंचचे जंगल या हिवाळ्यात असेच निसर्गसौंदर्याने बहरले आहे. यापूर्वी या व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रदर्शन सहज होत नसताना आता मात्र पर्यटकांना व्याघ्रदर्शन देखील होत आहे. त्यामुळे पहाटेच्या गारव्यात आणि धुक्याची चादर पसरली असताना त्यातून होणारे व्याघ्रदर्शन म्हणजे अनमोल भेट.
आणखी वाचा-‘एमपीएससी’ गट- ‘क’ सेवा परीक्षा, निकालाबाबत मोठी बातमी, नवीन अर्जदारांसाठीही महत्त्वाचे
पेंच व्याघ्रप्रकल्पात एकच वाघ नाही तर वाघाचे अवघे कुटूंबच थंडीची शाल पांघरुन धुक्याच्या चादरीतून वाट काढत जणू ‘मॉर्निंग वॉक’ करत निघाले. मागे पर्यटकांचे वाहन आणि समोर या संपूर्ण वाघाचे कुटूंब मस्ती करताना पर्यटकांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या. आपल्या मागे पर्यटकांची वाहने आहेत, याचे जराही भान वाघाच्या कुटुंबाला नव्हते. जणू पर्यटकांशी आपले काहीच देणेघेणे नाही, अशातऱ्हेने ते जंगलाच्या वाटेवरुन जणू ते ‘मॉर्निंग वॉक’ करत होते. त्यामुळे एरवी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणारे पर्यटक आज स्वत:च वाघाच्या कुटूंबियांचा ‘मॉर्निंग वॉक’ बघत होते. ‘मॉर्निंग वॉक’ शिस्तीतच करायचा नसतो तर तो ‘एन्जॉय’ करुनही करता येतो, हे या वाघाच्या कुटुंबाने पर्यटकांना दाखवून दिले. ‘टी६२’ ही वाघीण आणि तिच्या बछड्यांचा हा ‘मॉर्निंग वॉक’ पर्यटकांसाठी दिवाळीची भेट ठरला.