नागपूर : वर्षभरात सिग्नलवर घडलेल्या अपघातात शेवटच्या पाच सेकंदाच्या घाईमुळे सर्वाधिक अपघात घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्ते अपघातात सातत्याने वाढ होत आहे. शहरात दरवर्षी जवळपास ३० हजार नवीन वाहनांची भर पडत आहे. गेल्या वर्षी शहरात एकूण १ हजार २१६ रस्ते अपघातात झाले. त्यात तब्बल ३०१ जणांचा मृत्यू झाला.
नागपूर शहर पोलीस दलात वाहतूक पोलिसांची संख्या खूपच कमी असून वाहतूक सिग्नलची संख्या मात्र वाढत आहे. पोलीस, महापालिका आणि आरटीओ विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे अपघातावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलीस सुस्त असल्यामुळे वाहतूक सिग्नलवर अतिघाई करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. हिरवा दिवा लागण्यास ५ सेकंदाचा वेळ असतानाच चालक सुसाट वाहन पळवितात. त्याचवेळी विरुद्ध बाजूने येणारे वाहनचालक पिवळा दिवा लागल्यानंतर पटकन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे या पाच सेकंदात अपघात घडण्याचे प्रमाण मोठे आहे. गेल्या वर्षी १२१६ रस्ते अपघात घडले. यात ३०१ जण ठार झाले. यामध्ये ५४ पुरुष तर ४७ महिलांचा समावेश आहे. ७६ जण जखमी झाले आहेत.
कारवाईसह जनजागृतीचीही गरज
सर्वाधिक रस्ते अपघात मानवी चुकांमुळे होतात. परंतु, पोलीस दंडात्मक कारवाई न करता लाच घेऊन वाहने सोडतात. याच कारणांमुळे वाहनचालकांचे धाडस वाढते आणि सर्रास वाहतुकीचे नियम तोडले जातात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसह जनजागृतीही करण्याची गरज आहे.
शहरभरातील प्रत्येक सिग्नलवर पोलीस ठेवणे शक्य नाही. वाहनचालकांनी जबाबदारीचे भान ठेवावे. सिग्नलवर हिरवा दिवा लागल्यावरच वाहन समोर न्यावे. – रितेश आहेर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.