नागपूर : समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तर सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री १२ ते ३ च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीमधील अपघातांबाबत महामार्ग (सुरक्षा) पोलिसांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतु, उद्घाटनापासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले. त्यात १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २६२ जण गंभीर तर ४८६ जण किरकोळ जखमी झाले. अपघातांचे विश्लेषण केले असता सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत सर्वाधिक २११ अपघात झाले. त्यापैकी १०५ अपघातांत कुणीही जखमी नाही. तर १०६ अपघातांत २१ जणांचा मृत्यू तर ६० गंभीर तर १२५ जण किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक अपघाती मृत्यू रात्री १२ ते रात्री ३ पर्यंतच्या काळात झाले. या काळात ९१ अपघातांपैकी ३२ मध्ये कुणीही जखमी नाही. शिल्लक ५९ अपघातांत ४४ मृत्यू तर ३९ जण गंभीर तर ८४ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ३ ते पहाटे ६ पर्यंत येथे १४६ अपघातांपैकी ६४ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक ८२ अपघातांत ९ मृत्यू, ७९ गंभीर तर ९६ जण किरकोळ जखमी झाले. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत येथे १६८ अपघातांपैकी ७२ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक ९६ अपघातांत १७ मृत्यू तर ७१ जण गंभीर तर १११ जण किरकोळ जखमी झाले.

हेही वाचा – नागपुरात स्क्रब टायफसचा शिरकाव! दोन बळी?

संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत येथे ५४ अपघातांपैकी ३४ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक २० अपघातात एकही मृत्यू नसला तरी ८ जण गंभीर तर ३५ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ९ ते रात्री १२ पर्यंत येथे ५९ अपघातांपैकी ३१ मध्ये कुणीही जखमी नाही. शिल्लक २८ अपघातांत १० मृत्यू तर ५ जण गंभीर तर ३५ जण किरकोळ जखमी झाल्याचेही महामार्ग पोलिसांच्या अहवालात पुढे आले.

हेही वाचा – Gold Price: रक्षा बंधनला सोन्याच्या दरात उसळी; नागपुरात ‘हे’ आहेत दर

अपघात नियंत्रणासाठी विविध उपाय

अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग (सुरक्षा) डॉ. रवींद्र सिंगल नुकतेच नागपुरात येऊन गेले. त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत या अपघातांना अतिवेग, टायर फुटणे, महामार्ग संमोहन, यासह इतरही कारणे असून अपघात नियंत्रणासाठी विविध उपाय केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून येथे मृत्यू नसल्याचा दावा केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most accidents on samruddhi highway occur between 6 am and 12 pm reports the highway safety police mnb 82 ssb