अनिल कांबळे
नागपूर : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारासह महिला व मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. छेडखानीच्या घटनांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर तर पुणे आणि नागपूर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत एप्रिल २०२३पर्यंत सर्वाधिक ७१३ गुन्हे दाखल आहेत, ही माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईत गेल्या चार महिन्यांत विनयभंग, छेडछाडीच्या ७१३ घटना घडल्या. अन्य शहराच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीने जास्त आहे. याच कालावधीत ३२५ महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी सारख्या गुन्ह्याच्या २१८ घटना मुंबईत घडल्या आहेत. पुण्यात छेडखानीच्या १७९ घटना घडल्या तर ८९ महिलांवर बलात्कार झाले. नागपुरात गेल्या चार महिन्यांत १७८ तरुणी-महिलांच्या छेडछाडीच्या तर ८५ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या. १८३ मुली आणि तरुणींना फूस लावून किंवा वेगवेगळी आमिषे दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ
गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले दिसू नये, म्हणून छेडछाडी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करतात. तक्रारदार महिला-तरुणींना बदनामीची भीती दाखवली जाते. अशा प्रकरणात पोलिसांनी योग्य कर्तव्य बजावल्यास अशा घटना कमी होऊ शकतात.
निर्भया-दामिनी पथक सक्षम करण्याची गरज
पोलीस दलात प्रत्येक जिल्ह्यात दामिनी आणि निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांसह उद्यानासमोर होणारी छेडखानी रोकण्यासाठी ही पथके आहेत. मात्र, सुरुवातीला काही दिवस जोमाने काम केल्यानंतर दोन्ही पथके सुस्त झाली आहेत. त्यामुळे दामिनी-निर्भया पथकांनी आणखी सक्षम करण्याची गरज आहे.