लोकसत्ता टीम
नागपूर: केंद्र व राज्य शासन प्रत्येक वर्षी अपघात नियंत्रणासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह, महिना असे उपक्रम राबवत कोट्यवधींचा खर्च करते. त्यानंतरही राज्यातील चार शहरांची तुलना केल्यास सर्वाधिक अपघात मुंबई, पुणे, नागपूर शहरात झाल्याचे पुढे आले आहे. या अपघातात मोठ्या संख्येने मृत्यूही झाले आहेत.
राज्यातील नागपूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर, छत्रपती संभाजीनगर या चार शहरांची आकडेवारी माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या नोंदीनुसार चारही शहरांमध्ये अपघात व मृत्यूसंख्या एकत्र केल्यास १ जानेवारी २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ६ हजार ४९७ अपघात झाले. या अपघातात १ हजार ४५५ नागरिकांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा- बुलढाणा: काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… ‘हे’ आहे कारण…
शहरनिहाय आकडेवारी बघितल्यास सर्वाधिक २ हजार ८९२ अपघातात मुंबईत ४२६ नागरिकांचा मृत्यू झाला. नागपुरात १ हजार ४२६ अपघातात ३८२ मृत्यू, पुण्यात १ हजार ४७१ अपघातात ४१३ मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७०८ अपघातात २३४ मृत्यू झाल्याचे पुढे आले. केंद्र व राज्य शासनासह दोन्ही सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने अपघात नियंत्रणासाठी विविध उपाय व उपक्रमांची घोषणा होते. त्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. त्यानंतरही अपघात कमी होताना दिसत नाहीत. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात जिल्हा रस्ता सुरक्षितता समिती गठीत करत त्यात खासदारांचाही समावेश केला. लोकप्रतिनिधींना सहभागी केल्याने प्रभावी उपाययोजना राबवून अपघात कमी करणे अपेक्षित होते. परंतु अपघातांची संख्या बघता त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे.