अनिल कांबळे
तरुणी आणि अल्पवयीन मुलींची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असून अशा मुलींना देहव्यापारात ढकलण्यात येते अथवा जबरदस्तीने लग्न करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येतात. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून तस्करी झालेल्या ८५६ मुली-तरुणी देहव्यापारात ओढल्या गेल्या आहेत. यासंदर्भात राज्याचा देशात प्रथम क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) नोंदीतून समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मानवी तस्करीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने भारतातील विशिष्ट राज्यांसह मोठमोठय़ा शहरातून अल्पवयीन मुली व तरुणींना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांची तस्करी होते. त्यानंतर त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले जाते. अशा गुन्ह्यांच्या प्रकरणांत अनैतिक देहव्यापार (प्रतिबंधक) कायद्यातील तरतुदी तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला जातो. बऱ्याच प्रकरणात मुलींची खरेदी करणारे आणि त्यांना देहविक्रीसाठी जबरदस्ती करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल होतो. तसेच कुंटणखाने चालवणाऱ्या दलालांविरोधात गुन्हा दाखल होतो. परंतु, मुलींची तस्करी करणाऱ्या, त्यांना आमिष दाखवून शहरात आणणाऱ्या आणि मुलींच्या आईवडिलांना पैसे देऊन मुलींना खरेदी करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्या व्यक्ती किंवा दलालांची साखळी सुरूच असते.
‘एनसीआरबी’च्या नोंदीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यातील तस्करी करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींपैकी ८५६ मुलींना देहव्यापारात ढकलले आहे. तेलंगणा राज्यातून ५८४ तर, आंध्र प्रदेशातून २२३ तस्करी केलेल्या अल्पवयीन मुलींची तस्करी होऊन देहव्यापारात ढकलल्याची माहिती समोर आली आहे.
तस्करीसाठी जबाबदार घटक..
गरिबी, बेरोजगारी, शहरात राहण्याचे आकर्षण, जबाबदारी नको असलेल्या मुली किंवा आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींची तस्करी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. काही प्रकरणात आईवडिलांना पैसे देऊन मंदिरात लग्न लावल्यानंतर थेट मुलींना देहव्यापारात ढकलण्यात येते. लग्नासाठी लागणारा हुंडा आणि खर्च न झेपणारे पालकसुद्धा मुलींची लग्नाच्या नावावर विक्री करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पुनर्वसन आवश्यक..
देहव्यापाराच्या दलदलीतून पोलिसांनी सुटका केल्यानंतर मुलींना शासकीय सुधारगृहात ठेवण्यात येते. अशा तरुणींना आईवडील किंवा नातेवाईक बदनामीच्या भीतिपोटी स्वीकारत नाहीत. त्यामुळे पीडित तरुणींसमोर काही दिवसांनी परत देहव्यापारात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. देहव्यापाराच्या दलदलीतील तरुणींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण-प्रशिक्षण देणे गरजेचे असते. मात्र, पीडित तरुणींबाबत पोलीस, महिला व बाल कल्याण विभाग, गृहमंत्रालय, प्रशासकीय विभाग कुणीही गांभीर्य दाखवत नाही.
देहव्यापारातील तरुणींची आकडेवारी
राज्य महिला अल्पवयीन मुली
महाराष्ट्र ८५६ ६१
तेलंगण ५८४ ८५
आंध्र प्रदेश २२३ ११
बिहार १२२ ७८