नागपूर : कारागृहाच्या चिरेबंदी चार भींती आयुष्य कंठत असलेल्या कैद्यांचा कुटुंबियांशी संपर्क व्हावा आणि त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी कारागृह विभागाने ई मुलाखत उपक्रम राबवला. गेल्या १४ महिन्यांत राज्यभरात कैद्यांच्या ३ लाख १६ हजार ६४७ मुलाखती झाल्या असून या उपक्रमात पुणे-तळोजा कारागृहातील सर्वाधिक कैद्यांनी लाभ घेतला. तर मुंबई आणि ठाणे कारागृहातील कैद्यांचा तिसऱ्या व चवथ्या स्थानावर आहे.

राज्यातील एकूण ६० कारागृहांमध्ये जवळपास ४० हजरांपेक्षा कैदी बंदिस्त आहेत. शिक्षा भोगत असताना कैद्यांना आपल्या मुलांची किंवा कुटुंबियांची आठवण येते. मात्र, कुटुंबियांशी भेट होऊ शकत नसल्याने किंवा संवाद साधण्यास मिळत नसल्यामुळे अनेक कैदी नैराश्यात जात होते. त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी आणि त्याच्यातील सामाजिक भान कायम राहावे, यासाटी राज्य कारागृह विभागाने ई-मुलाखत उपक्रम सुरु केला. ई मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या मुलांना, पत्नी व आईवडिलांसह भावंडांना व्हिडिओ कॉलवरुन बघण्याची आणि संवाद साधण्याची संधी कैद्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे कैद्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल व्हायला लागला.

प्रत्येक कैद्यांमध्ये कुटुंबांप्रती प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हायला लागली. त्याच्या वागणुकीत सुधारणा होऊन त्याला कारागृहाच्या बाहेर निघण्यासाठी शिक्षेत सूट देण्यात येत आहे. ई-मुलाखत या उपक्रमात गेल्या १ जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ यादरम्यान राज्यभरातील कारागृहात ३ लाख १६ हजार ६४७ ई-मुलाखती झालेल्या आहेत. या कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सर्वाधिक ४५ हजार १७४ वेळा कैद्यांनी आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. तसेच तळोजा मध्यवर्ती कारागृह-४३,८४८, ठाणे मध्यवर्ती कारागृह-३६,३७१, मुंबई मध्यवर्ती कारागृह-२९,३४७, नागपूर मध्यवर्ती कारागृह-३१,४४४, कल्याण जिल्हा कारागृह-२२,६०८, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह- २३,८६० इतक्या ई-मुलाखती झालेल्या आहेत.

११०५ विदेशी कैद्यांनी पहिल्यांदाच बघितले कुटुंब

राज्यातील कारागृहांमध्ये ११०५ पेक्षा अधिक विदेशी कैदी असून अनेक वर्षांपासून त्यांचा आपल्या कुटुंबीय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी संपर्क नव्हता. अनेक विदेशी कैद्यांना आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉन्फेरन्सींगने बोलण्याची उत्सूकता होती. मात्र, ई-मुलाखत उपक्रमांमुळे राज्यातील कारागृहात बंदिस्त असलेल्या विदेशी कैद्यांनासुद्धा आपल्या आई-वडिल, पत्नी व मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

ई-मुलाखत उपक्रमाचा लाभ राज्यातील जवळपास सर्वच कैदी घेत आहेत. तसेच कारागृहात बंदिस्त असलेले विदेशी कैद्यांनासुद्धा या उपक्रमाचा लाभ मिळत आहेत. कुटुंबियांना बघून आणि संवाद साधून कैद्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येत आहेत. -प्रशांत बुरडे, (अप्पर पोलीस महासंचालक, राज्य कारागृह विभाग)

Story img Loader