अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : विविध कारणांमुळे देशात आत्महत्या करणाऱ्या महिला व पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो. प्रेमसंबंध, बेरोजगारी, अनैतिक संबंध, कौटुंबिक कारण, विवाहबाह्य संबंध आणि नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यात सर्वाधिक आत्महत्या बेरोजगारी, अनैतिक संबंध आणि प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून झाल्या आहेत. महाराष्ट्रात २२ हजार २०१ आत्महत्या झाल्या असून तामिळनाडूत १८ हजार ९२५ तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यात १३ हजारावर आत्महत्या झाल्याची नोंद आहे. देशात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहेत. त्यातही सुशिक्षित बेरोजगारांची संख्या उल्लेखनीय आहे.
नोकरी किंवा हाताला काम न मिळाल्याने अनेक बेरोजगार नैराश्यात जातात. रोजगार न मिळाल्याने काही जण जीवनव्यापन करण्यासाठी गुन्हेगारी किंवा वाममार्गाला लागून पैसा कमवायला लागतात. तर बहुतांश जण शेती, शेतमजुरी, शहरात कंपन्यात मजूर म्हणून कामाला लागतात. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी
किंवा सन्मानाने दोन पैसे कमावून जीवन जगण्याची आस धरून असतात. परंतु, अनेकांच्या नशिबी बेरोजगारी येते आणि कुटुंबाला हातभार लावण्याच्या वयात कुटुंबीयांच्या आधारावर जगण्याची वेळ येते. शिक्षण घेऊनही बेरोजगार असल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा पर्याय निडवला जाते. देशात पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या ७ हजार ६१३ जणांनी आत्महत्या केली.
अनैतिक संबंध, प्रेमसंबंधातील अपयश..
अनेक प्रेमीयुगुल प्रेमात यश न मिळाल्यास थेट आत्महत्या करण्याचा पर्याय निवडतात. प्रेमसंबंधातून ७ हजार ५६३ जणांनी आत्महत्या केली असून त्यात ४ हजार ६६७ युवक आणि २ हजार ८९४ तरुणींचा समावेश आहे. विवाहित असल्यानंतर अन्य महिलेशी अनैतिक संबंधातून ६९६ जणांनी आत्महत्या केली असून त्यात ४१८ पुरुष आणि २७८ महिलांचा समावेश आहे.
कौटुंबिक समस्याही कारणीभूत
समाजातील रूढी-परंपरा, संस्कृती, कुटुंबाचा मान-पान, समाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी कुटुंबीय आटापिटा करीत असतात. त्यामुळे कुटुंबीयांच्या विरोधात न जाता अनेक जण मानसिक तणावातून आत्महत्या करतात. यात मुली, तरुणी, विवाहित आणि घटस्फोटित महिलांचा समावेश आहे. देशात ५४ हजार ४१० जणांनी कौटुंबिक समस्यातून आत्महत्या केली असून त्यात ७ हजार ९०३ जणांनी लग्नाशी संबंधित कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात २ हजार ६४७ जणांनी लग्न न जुळल्याने तर १७२४ महिलांनी हुंडय़ाची पूर्तता केल्याने आत्महत्या केली. १४४८ जणांनी विवाहबाह्य संबंधातून तर ५६६ जणांनी घटस्फोट झाल्यामुळे आत्महत्या केली.
आव्हाने आणि अडचणींवर मात करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. मनाने खचून न जाता धैर्याने समस्यांना तोंड दिल्यास मनात आत्महत्येचे विचार येत नाही. सध्या प्रत्यक्ष संवाद संपला असून फक्त डिजीटल संवाद सुरू आहे. त्यामुळे एकटेपणा खूप वाढला आहे. माझ्या समस्येचे तत्काळ समाधान झाले पाहिजे ही भूमिका वाढली असून सहनशीलता संपली आहे. विचारांचे भयंकरीकरण जेव्हा अतिरिक्त होते, तेव्हा डोक्यात विचार येतात. त्यामुळे कुणाशी तरी मनमोकळेपणाने बोला. जेणेकरून आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होता येईल.
– प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ