अनिल कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर :  भारतात क्रिकेटवर सर्वाधिक सट्टेबाजी होते. सट्टेबाजीसाठी १०० पेक्षा जास्त बेटिंग अ‍ॅप असून यातून महाराष्ट्र सायबर पोलिसांना सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होते. गुजरात, महाराष्ट्, गोवा आणि दिल्लीत अ‍ॅपवरून सर्वाधिक सट्टेबाजी होत असल्याची माहिती  राज्य सायबर पोलीस विभागाच्या नोंदीतून समोर आली आहे.

सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू  आहे. क्रिकेट सट्टेबाजीमध्ये हजारो कोटींची उलाढाल असल्यामुळे तरुण-तरुणींसह मोठमोठे व्यापारी जुगारात गुंतले आहेत.  ऑनलाईन, लिंक किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून क्रिकेट सट्टेबाजीचे वाढते प्रमाण पाहता माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जुलै महिन्यात १३८ क्रिकेट अ‍ॅपवर बंदी घातली. त्यामध्ये वनएक्स बेट, लोटस ३६५, फेअरीप्ले, परीमॅच, दफा बेट, बेट वे सट्टा, राजा बेट, बेट विनर, मेल बेट अशा बेटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. परंतु, बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या संचालकांनी अन्य नावाने  अँप तयार केले.  क्रिकेट सट्टेबाजीच्या बनावट लिंक पसरवण्यामध्ये छत्तीसगड, झारखंड आणि राजस्थानातील सायबर गुन्हेगार पहिल्या स्थानावर असल्याची माहितीही पोलिसांच्या नोंदीतून समोर आली आहे.

हेही वाचा >>>यवतमाळचे पालकमंत्री हरवले! शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

हवाला रॅकेटच्या माध्यमातून ‘चुकारा’

सट्टेबाजीचे सूत्रधार चीन, फिलीपाईन्स, व्हियतनाम, रशिया, नायजेरिया आणि दुबईत असतात. दुबईतूनच सट्टेबाजीचे दर कमी-जास्त होत असतात. लहान सट्टेबाज बेटिंग लाईनवरून खायवाडी-लगवाडी करून दुबईतील सूत्रधारांच्या बुकवर रक्कम वळती करतात. त्यामुळे भारतात  पैशांचा ‘चुकारा’ हवाला रॅकेटच्या माध्यमातून केला जातो.

महादेव आणि डायमंड अ‍ॅपचा बोलबाला

छत्तीसगडमधील सौरव चंद्राकार आणि रवी उप्पल यांच्या महादेव क्रिकेट  अ‍ॅपमुळे पहिल्यांदाच हजारो कोटींची उलाढालीचा लेखा-जोखा उघडकीस आला. महादेव अ‍ॅपचे सर्वाधिक वापरकर्ता महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यात असून मोठमोठे राजकीय पुढारी, सिनेतारका, अभिनेते या   अ‍ॅपशी जुळले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्य अ‍ॅपच्या तुलनेत महादेव आणि सोंटू जैनचा डायमंड एक्स्चेंज अ‍ॅपचा देशभरात सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती पोलिसांच्या अभिलेखावर आहे.

क्रिकेटवर सट्टेबाजी अवैध आहे. नागरिकांना फसविण्यासाठी सायबर गुन्हेगारच बनावट लिंक किंवा बनावट  अ‍ॅप तयार  करतात. महाराष्ट्रासह अन्य राज्यात  असे बनावट  अ‍ॅपवरून फसवणुकीचे जाळे फेकले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी  क्रिकेट सट्टेबाजीच्या नादाला लागू नये. – अर्चित चांडक, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most used app for cricket betting in gujarat maharashtra amy