कामठीतील हृदयद्रावक घटना
मुलीच्या आजारावर खर्च करून बेजार झालेल्या व मुलीच्या रडण्याने त्रस्त होऊन जन्मदात्या आईनेच २३ दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याची घटना कामठी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आईने मुलीचा मृतदेह गाईच्या गोठय़ात पुरून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आईला अटक केली. पायल अनिल कनोजे रा. अरोली, मौदा असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती व तिचा पती मजुरीचे काम करतात. त्यांना आर्यन नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे. पायल दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. प्रसवकळा सुरू झाल्यानंतर पती व सासरचे मंडळी तिला ऑटोने कामठी येथे घेऊन येत असताना रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. पण, प्रसूतीदरम्यान मुलीचे डोके एका दगडावर आदळले. तिच्या डोक्याला दुखापत झाली. आई व मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केले. चिमुकलीने उपचाराला प्रतिसाद दिला. तिची प्रकृती सुधारली व डॉक्टरांनी त्यांना सुटी दिली. पण, उपचाराकरिता मुलीला रोज हजार रुपये लागत होते. यामुळे आई व वडील तणावात होते. आठवडय़ातून तीन दिवस त्यांना रुग्णालयात मुलीला दाखवायचे होते. बुधवारी पायल, अनिल व आजी हे मुलीला घेऊन कामठीत दाखल झाले. रनाळा परिसरात एका नातेवाईकाच्या घरी त्यांनी रात्री मुक्काम केला. रात्री सर्वजण झोपेत असताना मुलगी रडायला लागली. तिचे रडणे थांबत नसल्याने पायलने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाईच्या गोठय़ातील शेणाच्या उकिरडय़ात पुरला. मुलगी दिसत नसल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली.
घटना अशी उघडकीस आली
सकाळी उठून वडिलाने बघितले असता मुलगी दिसली नाही. त्याने चौकशी केली. त्यावेळी पायलने हात वर केले. मुलगी दिसत नसल्याने शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी पायल व मुलीच्या आजीची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पायलने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. चिमुकलीवर स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.