नागपूर : लग्न झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर महिला गर्भवती झाली. घरात आनंदी आनंद होता. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, महिन्याभरानंतर बाळ दूध पीत नसल्यामुळे आई तणावात आली.

दिवसेंदिवस बाळाची प्रकृती खालावत जात असल्यामुळे आईचा ताण वाढला. त्याच तणावातून तिने विष प्राशन करुन जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. भाग्यश्री राजेश वानखडे (२४, सर्वश्रीनगर, खोब्रागडे लेआऊट, हुडकेश्वर) असे मृत मातेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही मूळची पवनी-भंडाराची असून पदवीधर आहे. तिचे राजेश वानखडे यांच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. राजेश सोफ्याला कुशन लावण्याचे काम करतो. लग्नाच्या पाच वर्षांपर्यंत मूलबाळ होत नसल्यामुळे दोघेही चिंतेत होते. त्यांनी रुग्णालयात बराच खर्च केला. शेवटी भाग्यश्री गर्भवती झाली. त्यामुळे दोघांच्याही संसारात आनंद मावत नव्हता.

 भाग्यश्रीच्या आईवडिलांनी तिची काळजी घेतली. तिने गेल्या दीड महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. घरात आनंदाचे वातावरण होते. राजेश यांनी सर्व नातेवाईकांना निमंत्रण देऊन बाळाचा नामकरण विधी कार्यक्रम साजरा केला. महिन्याभरानंतर बाळाने दूध पिणे बंद केले. त्यामुळे बाळाला गायीच्या दूध पाजणे सुरु केले. मात्र, त्यामुळे भाग्यश्री तणावात आली.‘बाळ दूध का पीत नाही?’ असा प्रश्न ती आई-वडिल, पती आणि बहिणीला वारंवार विचारत होती. दिवसेंदिवस ती अबोल होत गेली आणि तणावात राहायला लागली. रोज रडत बसायची. त्यामुळे राजेशने तिच्या लाखांदूरला राहणाऱ्या बहिणीला समजूत घालण्याची विनंती केली. भाग्यश्रीला दुधाविना मुलीची तब्येतही खालावू लागली होती. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून ती आई अस्वस्थ होऊ लागली.

काय करावे हे तिला सुचेनासे झाले होते. त्यामुळे ती तणावात राहू लागली. तिचा तणाव दूर व्हावा, यासाठी राजेशने भाग्यश्रीला लाखांदूर येथील तिच्या मोठ्या बहिणीकडे पाठविले. पण, भाग्यश्रीचे मनोबल ढासाळतच होते. ती ११ फेब्रुवारीला घरी परतली. तेथून आल्यानंतरही ती उदास राहायला लागली.‘आता बाळाला कधीच दूध पाजू शकणार नाही’ असे विचार भाग्यश्रीच्या मनात येत होते. त्यामुळे बाळाला आईचे दूध आणि प्रेम देण्यासाठी असक्षम असल्याचे तिला वाटत होते. त्यामुळे तिने गुरुवारी सकाळच्या सुमारास विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटना उघडकीस येताच राजेशने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Story img Loader