रक्तगट समान असल्यासच किडनी प्रत्यारोपण शक्य असल्याची माहिती सर्वांनाच. पण, त्याला छेद देत सावंगी येथील वैद्यकीय चमूने हे आव्हान झेलत आई व मुलास जीवनदान दिले आहे. गरजू रुग्ण व किडनीदात्री आई या दोघांचेही रक्तगट वेगवेगळे असूनही आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील डॉ. संजय कोलते व चमूने ‘एबीओ इंकॉम्पिटेबल’ असा वैद्यकीय परिभाषा असलेला प्रकार हाताळला.
हेही वाचा >>> महाराष्ट्रातील विद्यापीठ, महाविद्यालये २० फेब्रुवारीपासून बंद! कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक संपामुळे विद्यापीठातील कामकाज ठप्प
शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाल्यावर क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समितीची परवानगी घेण्यात आली. प्रत्यारोपण करण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी आवश्यक औषधी शरीरात सोडण्यात आल्या. रक्ताचे शुद्धीकरण व रक्त बदलण्याची प्रक्रिया पार पडली. आईने स्वतःची किडनी देण्याची तयारी आपल्या २९ वर्षीय मुलासाठी दर्शवली होतीच. प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले. आधुनिक तंत्रज्ञान मदतीस आले. आई व मुलाची प्रकृती पूर्ववत झाल्यानंतर आज दोघांनाही सुट्टी देण्यात आली. डॉ. अभिजित ढाले, डॉ. जय धर्माशी, डॉ. शिवचरण बालगे, डॉ. अक्षय कृपलानी, डॉ. ऋतुराज पेडणेकर व अन्य डॉक्टरांनी हे कार्य तडीस नेले.