नागपूर : कोराडी आणि खापरखेडा येथे सध्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे प्रदूषणात वाढ होत असतानाच आता कोराडीत नव्याने वीज प्रकल्प उभारू नयेत, त्याऐवजी प्रस्तावित प्रकल्प पारशिवनीत हलवा, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
हेही वाचा – नेट आणि बीएडचा पेपर एकाचवेळी; अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी संभ्रमात
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात सध्या ६६० मेगावॅटच्या तीन संचातून १,९६० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. सोबतच बाजूला खापरखेडा औष्णित विद्युत प्रकल्प आहे. हे दोन्ही प्रकल्प नागपूर जिल्ह्यात असून या भागात प्रकल्पांमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे नवीन वीज प्रकल्पांना विरोध आहे. यासंदर्भात विदर्भ कनेक्टचे दिनेश नायडू यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांनी गडकरी यांची भेट घेतली व कोराडीत होणाऱ्या प्रस्तावित प्रकल्प उभारणीस विरोध करणारे निवेदन दिले. त्याची दखल घेत गडकरी यांनी हा प्रकल्प कोराडी ऐवजी पारशिवनीत उभारा, अशी विनंती करणारे पत्र फडणवीस यांना दिले आहे. पारशिवनीत प्रकल्प उभारल्यास तेथे रोजगार निर्मिती होईल शिवाय कोराडीतील प्रदूषणाची समस्या कमी होईल, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे.