बुलढाणा : भरवेगात जात असलेले मालवाहू वाहन चालकाला डुलकी लागल्याने उलटले आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेले…या विचित्र अपघातात जीवितहानी झाली नसली तरी यावेळी सुरक्षित अंतरावर थांबलेल्या काही वाहनचालक आणि गावकऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला…मेहकर ते शेगाव पालखी महामार्गावरील संगम फाटा गोमेधर येथे शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ही दुर्घटना घडली.

वाहन थांबल्यावर भानावर आलेल्या बघ्यानी मालवाहू ‘आयशर’ मध्ये अडकलेल्या चालक आणि वाहकाला कसेबसे बाहेर काढले. हे दोघे नशीब बलवत्तर म्हणून सुखरूप बचावले. चालक किरकोळ जखमी झाला असून वाहकाला अंगावर खरचटले सुद्धा नाही! यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा सुखद प्रत्यय आला आहे. अकोला येथून वाहनात माल भरुन ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर कडे जात होते. दरम्यान गोमेधर नजीकच्या संगम फाटयावर चालकाला क्षणभर डुलकी लागली. लगेच भानावर आल्याने त्याने जोरात ब्रेक लावून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन थांबण्याऐवजी रस्त्यावर संपूर्ण आडवे झाले आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेले. सुदैवाने यावेळी रस्त्यावर, वाहनाच्या आसपास अन्य कोणतेही वाहन नसल्यामुळे अनर्थ टळला. तसेच मालवाहू वाहनांचे चालक आणि वाहक दैव बलवत्तर म्हणून सुखरूप बचावले आहे. किरकोळ जखमी चालकाला जानेफळ (तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा) येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

हेही वाचा…एसटी अपघाताचे कळताच मुख्यमंत्री मदतीला धावले… इतक्याची आर्थिक मदतीची…

‘त्याने’ पाहिला ‘अपघात

दरम्यान अपघातग्रस्त वाहन भरवेगात उलटल्याने मोठा आवाज झाला.यामुळे संगम फाट्यावर असलेले प्रवासी, गावकरी, किरकोळ विक्रेते वाहनाकडे धावत वाहन अनियंत्रित झाल्यावर समोरून दुचाकीने येणाऱ्या व्यक्तीने आपले वाहन दूर ,सुरक्षित अंतरावर थांबविले. त्याने हा विचित्र अपघात प्रत्यक्ष बघितला तसेच अपघात स्थळा जवळ असलेल्या ग्रामस्थांनी देखील हा थरार बघितला.यामुळे त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला.यानंतर भानावर आलेल्या ग्रामस्थांनी वाहनातून चालक, वाहक याना सुखरूपपणे बाहेर काढले. गतीरोधक आवश्यक दरम्यान मागील दोन-तीन दिवसात घाटनांद्रा फाट्यावर लहान सहान अपघात झाले आहे. आदल्या रात्री अपघात होऊन एक इसम ठार झाल्याची घटना घडली होती. वाहने जोरात येऊन घाटनांद्रा फाट्यावरील वळणावर जास्त अपघात जास्त होत असतात, असे व्यावसायिक अनिल मंजुळकर यांनी सांगितले. त्यामुळे संगमफाटयावर गतिरोधक बसविण्याची मागणी त्यांनी बोलून दाखविली आहे. बांधकाम विभागाने तातडीने ही कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली.