वर्धा : आर्वी विधानसभा मतदारसंघ पक्षाकडे खेचून घेतानाच पत्नी मयुरा काळेसाठी उमेदवारी आणण्यात खासदार अमर काळे यशस्वी ठरले आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात वर्धा जिल्ह्यातून मयुरा अमर काळे यांचे नाव आर्वी विधानसभा क्षेत्रातून निश्चित करण्यात आले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवितानाच आर्वी मतदारसंघ पक्षच लढणार, असे स्पष्ट केले होते. ते अखेर खरे ठरले. मयुरा काळे या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या भाची होत. आर्वीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला राहल्याने काँग्रेसने ही जागा सोडू नये, असा आग्रह नेत्यांनी मुंबई व दिल्लीतील पक्षाच्या बैठकीत धरला. तशी नावेही सूचविण्यात आली. मात्र छाननी समितीत असलेल्या नावांवर चर्चा न होता अकस्मात पुढे आलेल्या मयुरा काळे यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. तेव्हा इच्छुक असलेले शैलेश अग्रवाल, बाळा जगताप व अनंत मोहोड यांनी आक्षेप घेतले. वरिष्ठांकडे तक्रार केली. खुद्द राहुल गांधी यांनी मयुरा काळे हे एकच नाव काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या यादीत कसे, अशी विचारणा केल्याचे वृत्त उमटले.
आणखी वाचा-काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाला मतदारसंघ मिळेना… पक्षाने मुलालाही वाऱ्यावर सोडल्याने…
शैलेश अग्रवाल यांनी ही आपल्या तक्रारीची दखल असल्याचे नमूद केले. नंतर ही जागा काँग्रेसकडेच ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या व अन्य पक्षाच्या एका मोठया नेत्याचे नाव पुढेही करण्यात आले. मात्र या घडामोडी होत असतानाच तिकडे राष्ट्रवादीने नावे घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात मयुरा काळे यांचे नाव समोर आले. काँग्रेस नेते गपगार झाले. जो जिता वो सिकंदर, अशी प्रतिक्रिया देत अग्रवाल म्हणाले की आम्ही मागे पडलो हेच खरे.
आर्वी मतदारसंघात काळे कुटुंबाचे नेहमी वर्चस्व राहिले. त्यामुळे कुटुंबाचा हा बालेकिल्ला सोडण्यास अमर काळे तयार नव्हते. लोकसभा निवडणुकीत आपण काही अटी ठेवून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारल्याची प्रतिक्रिया त्यांनी तेव्हा दिली होती. त्यात पत्नीसाठी उमेदवारी ही तर अट नव्हती ना, असे विचारले जात आहे. काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादीच आर्वीची जागा लढणार, असा जयंत पाटील यांचा आग्रह असल्याचे त्यावेळी अमर काळे बोलले होते. सहा महिन्यानंतर ते शब्द खरेच ठरले आहेत. एकाच कुटुंबात लोकसभेसोबतच आता विधानसभेचाही झेंडा फडकणार का,याकडे आता लक्ष लागले आहे.