वर्धा : शिवसेना ठाकरे गटाचे शक्तिपीठ म्हणून ओळख दिल्या जाणाऱ्या मातोश्री या स्थानाचे महात्म्य कडवा शिवसैनिक चांगलाच ओळखून आहे. त्याचीच आठवण देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना सतर्क केले. वर्धा विधानसभा क्षेत्र प्रमुख निहाल पांडे यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले.

अरविंद सावंत म्हणाले, येथे महाविकास आघाडीचा खासदार आपण निवडून आणला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीस लागा. जुने-नवे असे वाद करू नका, मातोश्रीचे आदेश पाळा, दगडास शेंदूर फासण्याचा आदेश मातोश्रीने दिला तर तो निमूटपणे पाळा. आता विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे, हा निर्धार ठेवा. हे उद्घाटन म्हणजे त्याचा मुहूर्त समजा. वर्ध्यात भगवा फडकला पाहिजे. कुठेही वाद नको. बाळासाहेब ठाकरे यांची ही सेना आहे. त्यांनी सामान्य माणसांचा आवाज बुलंद केला. हा आवाज कायम राहिला पाहिजे म्हणून संघटना बांधा. शाखा ते शहर पातळीवार मजबूत व्हा, अन्यायाविरोधात पेटून उठा, असा सल्ला खासदार सावंत यांनी दिला.

हेही वाचा – पीक कर्ज वाटपात यंदाही कूर्मगती, अकोला जिल्ह्यात केवळ ५२.५८ टक्के शेतकऱ्यांनाच…

कार्यालय म्हणजे कार्याचा आलय म्हणजे डोंगर. कार्याचा डोंगर उभा झाला पाहिजे. या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवावेत. हे गरिबांच्या हक्काचे स्थळ व्हावे. महिलांना विविध योजना, उपक्रम या माध्यमातून सक्षम करण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. शिवसेना म्हणजे न्यायसेना असा अर्थ अपेक्षित आहे. निहाल सारखा एक तरुण मुलगा कार्यालय उघडून सेवेसाठी बसतो आहे, ही बाब प्रशंसनीय असल्याचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ : बांधकाम कामगारांनो लक्ष द्या, आता तालुकानिहाय निश्चित केलेल्या दिवशीच मिळणार गृहोपयोगी वस्तू

ठाकरे गटाच्या सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख असलेले सावंत विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. तसेच निहाल पांडे यांच्या राष्ट्रसंत चौक आर्वी नाका येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. जिल्हा शिवसेनेत वेगवेगळे गट आहेत. त्यात निहाल पांडे यांचा गट नव्याने आल्याने पक्षातील चूरस आणखीच वाढली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार म्हणून विजयाचे सामूहिक प्रयत्न करण्याचा सल्ला खासदार सावंत यांनी दिला. मात्र या आघाडीत ठाकरे गटास जिल्ह्यातून दोन जागा मिळाव्या, असा स्थानिक ठाकरे सेनेचा प्रयत्न आहे. पण एकमेकांवर कुरघोडी करणारे राष्ट्रवादी शरद पवार तसेच काँग्रेसचे नेते या सेनेस जागा सोडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.