चंद्रपूर : देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारा अर्थसंकल्प असून, मला पहा आणि फुले वहा, असा हा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, मजूरवर्ग, वाढती गरिबी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. गरिबी व बेरोजगारीमुळे महागाईचे चटके गरिबांना जाणवत आहेत. प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट झाले पण कुणाचे? गरिबांचे की श्रीमंतांचे, हे लक्षात घेतले पाहिजे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा असून अंमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊनच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात वर्षभरात या घोषणा किती पूर्ण होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. अर्थमंत्र्यांनी देशात ५० नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. मात्र, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूरचा विमानतळ अद्यापही पूर्ण झालेला नाही. केलेल्या घोषणा पूर्ण होत नसतील, तर अशा अर्थसंकल्पाला काही अर्थ नाही, असेही धानोरकर म्हणाले.