लोकसत्ता टीम
वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची अखेरच्या क्षणी उमेदवारी कापून शिवसेना शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून खासदार भावना गवळी यांनाच नव्हे तर सर्वांनाच धक्का दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ येथे हजर असतानाही गवळी मात्र दूरच राहिल्या. गुरुवारी काही कार्यकर्त्यांसह त्या त्यांच्या निवासस्थानी होत्या. त्यानंतर मात्र रात्री उशीरा यवतमाळ येथून थेट रिसोड येथील स्वगृही दाखल झाल्या. पक्ष त्यांची नाराजी दूर करणार का, त्यांचे पुनर्वसन होणार का, त्या काय भूमिका घेणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा पारंपरिक गड म्हणून ओळखला जातो. मागील २५ वर्षांपासून खासदार भावना गवळी येथून निवडून येत आहेत. मागील तीन टर्मचा विचार करता त्या भरघोस मतांनी निवडूक जिंकून येत आहेत. भावना गवळी यांनी २००९ मध्ये काँग्रेस चे हरिभाऊ राठोठ, २०१४ मध्ये काँग्रेसचे शिवाजी राव मोघे तर २०१९ मध्ये काँग्रेस च्या माणिकराव ठाकरे यांचा १ लाखाच्या फरकाने त्यांनी पराभव केला होता. अनेक दिग्गज नेत्यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली होती. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्या.
आणखी वाचा-काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
यवतमाळ वाशीम मधून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी तयारीही सुरु केली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने संभाव्य उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यामध्ये भावना गवळी यांचे नाव नसल्याने व भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये त्यांच्या नावाला विरोध दर्शवील्याने गवळी यांच्या उमेदवारी वरून तर्क वितर्क लावले जात होते. मात्र उमेदवारी आपल्यालाचं मिळेल, अशी त्यांच्यासह समर्थकांना आशा होती. उमेदवारी करीता त्यांचे अविरत प्रयत्न देखील सुरु होते. मात्र, शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाने राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने खासदार भावना गवळी व समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्या अपक्ष म्हणून लढणार अशीही चर्चा रंगू लागली मात्र त्यांनी पक्षाविरोधात न जाता शांत राहणे पसंत केले.
गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. परंतू त्यांनी उपस्थिती न लावता यवतमाळ येथील निवासस्थानीच होत्या. यावेळी त्यांच्यासोबत काही ठराविक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्या रात्री उशीरा रिसोड येथे पोहचल्याची माहिती आहे. उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज असल्याची चर्चा आहे. वाशीम येथील जन शिक्षण संस्थान ह्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते दिसून आले.