गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मेळावे, सभा, दौरे आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याकरिता सर्वपक्षीय नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

गोंदियातील सर्कस ग्राउंडवर शुक्रवारी काँग्रेसचा महामेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मंचावर उपस्थित होते. या मेळाव्यात काँग्रेस खासदाराने केलेले एक वक्तव्य उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेले.

हे ही वाचा…शरद पवार गटाच्या संपर्कात आणखी एक नेता! जयंत पाटलांसोबत कारप्रवास अन्…

विशेष म्हणजे, हे खासदार दोन दिवसांपूर्वीदेखील चर्चेत आले होते. भंडारा जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करताना याच खासदारांनी केलेले कृत्य प्रचंड गाजले. तुमसर तालुक्यातील एका गावात खासदार महोदयाला सोशल मीडियावर स्वत:ची पब्लिसिटी करण्याची हौस जडली. मग काय, खासदारांनी चक्क कारच्या बोनेटवर बसून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. खासदारांच्या या स्टंटबाजीचा त्यांच्या कार्यकर्त्याने व्हीडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात या व्हीडिओची चर्चा झाली. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या प्रकरणाची शाई अद्याप वाळली नसताना हेच खासदार महोदय पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.

जनतेला आश्वासन देताना स्वत:लाच दिली उपाधी

काँग्रेसच्या महामेळाव्यात मंचावर उपस्थित नेत्यांना आणि जनतेला एक आश्वासन दिले. तीन महिन्यांआधी खासदार झालेल्या या महोदयांनी आपले संपूर्ण भाषण कागदावर लिहून आणले होते. त्यातील एकेक शब्द त्यांनी वाचून दाखवला. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आणि जनतेला आश्वासन देताना त्यांनी स्वत:लाच बैलाची उपाधी देऊन टाकली.

हे ही वाचा… यवतमाळ : बाबाजी दाते महिला बँकेच्या तत्कालीन सीईओंसह चौघांना अटक, २४२ कोटींची कर्ज थकबाकी…

नेमकं म्हणाले तरी काय?

स्वत:ला बैलाची उपाधी देणारे हे काँग्रेसचे खासदार आहेत डॉ. प्रशांत पडोळे. खासदार पडोळे या महामेळाव्यात म्हणाले, मी काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि उपस्थित जनसमुदायाला या बाबीची हमी देऊ इच्छितो की, काँग्रेस संघटन वाढविण्याकरिता आणि गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील समस्या सोडवून आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याकरिता, वर्षातून फक्त एक दिवस पूजल्या जाणाऱ्या आणि वर्षभर शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलाप्रमाणे वर्षांतील ३६४ दिवस काम करेन. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांसह उपस्थितांत एकच हशा पिकला.

वडेट्टीवारांनी आणखी एका नेत्याला बैल संबोधले!

खासदार प्रशांत पडोळे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पडोळे यांच्याच शब्दाला पकडून आपल्या भाषणाला सुरुवात केली. खासदार पडोळे यांच्या सोबतीला आम्ही आणखी एक बैल दिला आहे. त्यांचे नाव आहे, गोपालदास अग्रवाल. या बैलजोडीवर गोंदिया-भंडारा जिल्ह्यांच्या विकासाची जबाबदारी आम्ही टाकली आहे. बैलजोडी काँग्रेस पक्षासाठी काही नवीन नाही, ती आमच्या पक्षाची जुनीच निशाणी आहे. या बैलजोडीच्या प्रयत्नांतून आम्ही गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सातही जागा जिंकू, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

हे ही वाचा… गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’

आपल्या आगळ्यावेगळ्या वक्तव्य आणि कृत्यांमुळे खासदार डॉ. प्रशांत पडोळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात विख्यात होत चालले आहेत. याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी गोपालदास अग्रवाल यांनाही बैलाची उपाधी दिल्याने त्याचीही चर्चा जोरात सुरू आहे.