लोकसत्ता टीम
चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर पूर्णत्वाला आणले, मथुरेत कृष्ण मंदिर लवकरच साकार होणार विश्वास प्रसिध्द अभिनेत्री, नृत्यांगणा व भाजपच्या खासदार हेमामालीनी यांनी व्यक्त केला.
मथुरेतून तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून जाणार असे सांगतांनाच मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली तर स्वीकारणार आहे. भाजपाने लोकसभेच्या पहिल्या यादीत केवळ २८ महिलांना उमेदवारी दिली असली तरी उर्वरीत यादीत महिलांना स्थान मिळेल असेही त्या म्हणाल्या.
ताडोबा महोत्सवासाठी खासदार हेमामालीनी आज येथे आल्या असता चांदा क्लब ग्राऊंड येथे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत पत्रपरिषदेत विविध विषयांवर चर्चा केली. गेल्या दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये भाजप व मित्र पक्ष ४०० चा टप्पा पार करेल. मथुरा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते व अन्य कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात मथुरा व वृंदावनला विकास कामांमध्ये प्रथम क्रमांकावर न्यायचे आहे असेही त्या म्हणाल्या.
आणखी वाचा-…तर महाराष्ट्रात वंचित विरूद्ध भाजप अशीच लढत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा
भाजपाच्या पहिल्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा , मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही हेमामालीनी यांनी आभार मानले. काँग्रेस काळात महिलांसाठी कामे झाली नाही मात्र मोदींनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात चांगली कामे केली असेही त्या म्हणाल्या. ताडोबा महोत्सवात गंगा नृत्य सादर करणार आहे. गंगा नदीचा थेट पर्यावरणाशी संबंध आहे. मागील दहा वर्षात नमामी गंगा कार्यक्रमांतर्गत नदी स्वच्छता व सुंदरतेची कामे मोठ्या प्रमाणात केली गेली. देव लोकातून गंगा नदी आली असून राम, कृष्ण व कलियुगासोबतच मोदी युग पण गंगा नदीने बघितले आहे असेही हेमामालीनी म्हणाल्या. ताडोबा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाचे कौतुक केले.३० वर्षानंतर चंद्रपुरात आली असून मोदी युगात या शहरात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. काही दिवसात नातवंडांना घेवून ताडोबा सफारीला येईल असेही त्या म्हणाल्या. सध्या चित्रपटापासून दूर असली तरी चांगली कथा आली तर चित्रपट करू, सध्या बॉलीवूड मध्ये आलिया भट्ट व दिपिका पादुकोण ड्रीम गर्ल आहे असेही त्या म्हणाल्या.
आणखी वाचा-तीन मद्यधुंद तरुणींचा भर चौकात राडा, व्हायरल व्हिडिओची समाजमाध्यमांवर चर्चा
ताडोबा महोत्सव जगातील २० कोटी लोकांपर्यंत पोहचला
ताडोबा महोत्सव जगातील २० कोटी लोकांपर्यंत पोहचला आहे. हा महोत्सव सध्या देशात सर्वत्र चर्चेत आहे. २० देशातील विश्वसुंदरींनी या महोत्सवाचे कौतूक केले आहे. तसेच देशविदेशातून देखील या महोत्सवावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. या महोत्सवामुळे ताडोबाचे नाव संपूर्ण जगात पोहचले आहे. तीन दिवसाच्या या महोत्सवाने चंद्रपूर, ताडोबा व ताडोबातील वाघ आकर्षणाचे केंद्र बनला आहे. -सुधीर मुनगंटीवार, वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा