Nitin Gadkari on Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादातून नागपुरातील महाल परिसरात काल रात्री हिंसाचार उफाळून आला. दोन गट आमने सामने आल्याने तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. दरम्यान, आता नागपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात सखोल चौकशी करून कारवाई करण्याची आदेश पोलिसाना दिले आहेत. दरम्यान, नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही व्हिडिओ जारी करून नागरिकांसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
“काही अफवा पसरल्यामुळे नागपूरमध्ये धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत नागपूरमध्ये शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषतः राहिली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावी. कोणीही रस्त्यावर येऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था राखावी. सलोख्याचे आणि सौहार्दाचे नातं ठेवण्याची परंपरा कायम ठेवावी. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या असतील किंवा गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल”, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नागपूरच्या नागरिकांना विनम्र आवाहन. pic.twitter.com/2jcCv4AaVN
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 17, 2025
नागपुरात नेमकं काय घडलं?
- औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला.
- औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- काही समाजकंटकांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करीत रस्त्यावरी वाहनांची तोडफोड केली. ई रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.
- स्त्यावर उभ्या दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली. यामध्ये सर्वाधिक नुकसान ई रिक्षाचे झाले आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, पोलीस आयुक्त,सहआयुक्तांसह सर्वच अधिकारी महालमध्ये दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.