गोंदिया : माझी जुन्या राज्यसभेची निवड काही तांत्रिक कारणामुळे राजीनामा देवून नव्याने राज्यसभा निवडणूक लढवून ती अविरोधपणे निवड झाली असल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली दावेदारी सोडली, असे कुणीही गृहीत धरू नये. यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागावाटप निर्णय पुढील दोन तीन दिवसांत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भंडारा-गोंदिया लोकसभेची दावेदारी अद्यापही सोडली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
पटेल आज गुरुवार ७ मार्चला सडक अर्जुनीतील पंचायत समिती समोरील पटांगणात गोंदिया-भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे आयोजित शेतकरी मेळावा व कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे उपस्थित होते.
हेही वाचा – नागपुरात हजारो कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’! साडेआठ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश
पुढे पटेल म्हणाले की, पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या दोन्ही लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकत असल्यामुळे या दोन्ही जागेवर आम्ही दावेदारी केलेली आहे. पैकी एक तर मिळावी अशी अपेक्षा आहे. पण जागावाटप दरम्यान काही अपरिहार्य बाबींमुळे युतीधर्मही पाळावे लागणार आहे. लोकसभेच्या ४८ जागावाटपाचा जो निर्णय होईल ते महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या सर्वसंमतीने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा मोठ्या बहुमताने निवडून आणण्याकरिता आम्ही त्यांच्यासोबत मैत्री केलेली आहे. ती राखावीच लागणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींची जागावाटपात चर्चा होणार आणि त्यानंतरच कोण कुठल्या जागेवर लढणार याचा निर्णय होणार असल्याचे पटेल या प्रसंगी म्हणाले.
हेही वाचा – खासदार भावना गवळी यांचे तिकीट कटणार? महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे की राजू पाटील राजे!
‘दोन्ही जिल्ह्यांतील आमदार-खासदारांची कुंडली माझ्याकडे’
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राजकीय वैर विदर्भात सर्वश्रुत आहेच. हा वाद आज ७ मार्चला गोंदियाकरांसह राज्याच्या जनतेला पाहायला मिळाला. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी पंचायत समितीच्या पटांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना प्रफुल पटेल यांच्या भाषणात तो जाणवला. भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाबाबत बोलताना भाषणाच्या ओघात पटेल म्हणाले की भंडारा – गोंदिया दोन्ही जिल्ह्यांतील आमदार- खासदारांची कुंडली माझ्याकडे आहे, असा थेट इशाराच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे नाव न घेता दिला आहे. दरम्यान, असे वक्तव्य करत व्यासपीठावर उपस्थित आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे कटाक्ष टाकत एक प्रकारे त्यांनाही आपल्यासोबत राहण्यात फायदा आहे, अशी समजसुद्धा या इशाऱ्यातून दिल्याचे जाणवले.