बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह बुलढाणा मतदारसंघातही राजकीय स्थित्यंतराचा नवा नमुना पहायला मिळाला. एकेकाळी एकमेकांविरोधात लढलेले दोन नेते आज एकत्र आले अन् तेही या दोघांपैकी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यापैकी एक नेता २००९ आणि २०१९ मध्ये जाधव यांच्याच विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला होता. खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह युतीच्या आमदारांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप बंडखोर विजयराज शिंदे वगळता जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी साडेअकराच्या सुमारास खासदार जाधव नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर खासदार जाधव शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर जाहीर सभादेखील होणार आहे.
हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ
चौथ्यांदा मैदानात
खासदार प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा लोकसभेसाठी मैदानात उतरले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या सलग तीन लढतीत विजय मिळवीत त्यांनी हॅटट्रिक साधली. काँग्रेसचे शिवराम राणे यांच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी साधली होती.
आधी पराभूत झाले, आता सोबतीला आले
खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार आकाश फुंडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यात आणखी एक चेहरा होता, तो म्हणजे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे. राजेंद्र शिंगणे २००९ आणि २०१९ मध्ये प्रतापराव जाधव यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. प्रतापराव जाधव शिवसेनेकडून (एकसंघ) तर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून.
२००९ मध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे अशी तुल्यबळ लढत बुलढाण्यात झाली होती. या लढतीत २८ हजार मतांनी प्रतापराव जाधव यांचा विजय झाला होता. यानंतर पुन्हा म्हणजेच २०१९ मध्ये या दोघांत लढत झाली. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते. प्रतापराव जाधव आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली होती.
हेही वाचा – ‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
२००९ आणि २०१९ मध्ये एकमेकांविरोधात लढलेले दोन नेते आज एकत्र आले. यापैकी एकाने म्हणजेच प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला, तर त्यांच्याकडून दोनदा पराभूत झालेले राजेंद्र शिंगणे महायुतीचा धर्म पाळत त्यांच्या सोबतीला हजर होते. राजकीय स्थित्यंतराचे असे अनेक नमुने यापुढे राज्यभरात पहायला मिळणार आहे.