संजय मोहिते
कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो पदयात्रेची एक विशिष्ट नियमावली (कोड ऑफ कंडक्ट) आहे. प्रत्येक १० दिवसानंतर एक दिवस विश्रांती हा त्यातील एक नियम. मात्र, महाराष्ट्रातील देगलूर ते निमखेडी दरम्यानच्या जंगी यात्रेत या नियमाला अपवाद करीत ही यात्रा दोन दिवसांकरिता विसावा घेणार आहे. याला कारण गुजरात विधानसभेच्या निवडणुका आहे.
हेही वाचा >>>वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बनावट यादीमुळे गोंधळ; बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता
भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आम आदमी पक्ष आधीच उतरला आहे. काँग्रेस पक्षासाठी यंदाची निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे. त्यामुळे यात्रेच्या दोन दिवसांच्या विश्रांतीचा लाभ घेत खासदार राहुल गांधी आज औरंगाबादमार्गे गुजरातकडे रवाना झाले. आज, सोमवारी २१ नोव्हेंबरला १२ वाजून ४० मिनिटांनी राहुल गांधी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने निमखेडी येथील हेलिपॅडवरून उड्डाण केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष संजय राठोड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व अन्य नेत्यांनी त्यांना निरोप दिला. ते हेलिकॉप्टरने औरंगाबाद येथे जाणार असून तेथून विमानाने गुजरातला जाणार आहेत.
हेही वाचा >>>VIDEO: ‘आज जेल, कल बेल’, ‘बादशाह बोलते, चाकू मारते’; चक्क पोलीस व्हॅनमध्ये बसून आरोपीची डायलॉगबाजी, व्हिडीओ व्हायरल
गुजरातमध्ये राहुल गांधी राजकोट व चिखली-नवसारी येथे आयोजित प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. यानंतर औरंगाबाद मार्गे निमखेडी येथे २२ ला संध्याकाळपर्यंत परत येणार आहेत. निमखेडी येथेच उभारण्यात आलेल्या सुसज्ज कॅम्पमध्ये ते ११८ भारत यात्री समवेत मंगळवारी रात्री मुक्कामी राहणार आहेत. २३ तारखेला सकाळी ६ वाजता ही पदयात्रा मध्यप्रदेशाकडे कूच करणार आहे.