वर्धा: संधी साधणार नाही तो पट्टीचा राजकारणी कसला, असे म्हटले जाते. संवाद झडला की आपल्या शासनाची तरफदारी करणे ओघाने आलेच. खासदार रामदास तडस यांची तर यात हातोटीच समजल्या जाते. देवळी तालुक्यातील एका गावातून कार्यक्रम आटोपून ते बाहेर पडले. गाडी अडचणीत पडल्याने ते व सहकारी पायीच निघाले. वाटेत एका हातगाडीवर एक महिला पाणी पुरी विकत होती. गाडी यायला वेळ असल्याने त्यांनी मग पाणी पुरीचा आस्वाद घेण्याचे ठरविले.
ठसका लागेपर्यंत सर्वांनी आनंद घेतला. गप्पा सुरू झाल्या. खासदार त्या महिलेस विचारते झाले. किती रोजगार मिळतो, शिल्लक किती उरतो, यात कुटुंबाचे भागते का, अशी विचारणा महिलेस झाली. आणि मग खासदारांनी विश्वकर्मा योजनेची माहिती दिली. या योजनेत एक लाखापर्यंत कर्ज मिळते. त्याचा लाभ घ्या.
हेही वाचा… नागपुरातील बरेच पेट्रोल पंप कोरडे; स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता
स्वनिधी योजना पण उपयुक्त आहे, असेही सुचविले. आणि मग कळीचा मुद्दा काढला. पुढे निवडणुका आहेत, कोण निवडून येणारं असा प्रश्न केल्यावर महिला उत्तरली, अजी मोदीच येणार. यावर खासदारांची कळी न खुलली तर नवलच.