गर्दी बाबतच्या प्रश्नावर खासदार विनायक राऊत यांचे आव्हान

महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेसाठी मिळालेल्या मैदानाला विरोध दर्शवत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे सातत्याने आंदोलन करत आहे. त्यांनी सभेतील गर्दीबाबतही शाशंकता व्यक्त केली होती. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी सभेत बसण्यासाठी आमदार कृष्णा खोपडेंना सोफा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

रवीभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत पुढे म्हणाले, १६ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता एनआयटी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होईल. सभेसाठी मैदानात सुमारे ५० हजार खुर्चा लागणार असून तेवढ्याच नागरिकांना उभे राहून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना एकता येईल. सभेला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून आमचे नेते उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. पत्रकारांनी यावेळी कृष्णा खोपडे यांनी संबंधित मैदानात एवढ्या खुर्चा येत नसल्याने महाविकास आघाडीकडून होणाऱ्या सभेतील संभावित गर्दीच्या आकड्यावर प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, आमदार कृष्णा खोपडे यांची इच्छा असल्यास त्यांना मैदानात बसण्यासाठी विशेष सोफ्याची सोय केली जाईल. तेथे बसून ते खुर्चा व इतर उपस्थितांची संख्या मोजू शकतील.

हेही वाचा >>>मविआच्या नागपूरमध्ये होण-या सभेला फडणवीस- बावनकुळे घाबरले, म्हणून विरोध, खासदार विनायक राऊत यांचा टोला

दरम्यान, विदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मजबूत करण्यासाठी शिवसेनेचा पाया चांगला असलेल्या रामटेक, भंडारा आणि पूर्व नागपूरच्या जागेवर लक्ष केंद्रीत केले जाईल. सध्या महाविकास आघाडीची कोणत्या जागी कोण लढणार याबाबत चर्चाच झाली नाही. परंतु हे जागेचे सूत्र निश्चित झाल्यावर संबंधित पक्ष तेथे उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही राऊत म्हणाले.

Story img Loader