नागपूर: महाविकास आघाडीच्या नागपुरातील १६ एप्रिलला होणा-या वज्रमुठ सभेला लक्षावधी नागरिकांची गर्दी जमणार आहे. हा अंदाज बघता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे घाबरले आहे. त्यातूनच भाजप वेगवेगळ्या पद्धतीने सभेला विरोध करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी लगावला.
नागपुरातील रवीभवन येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप पहिल्या दिवशीपासून राज्यात महाविकास आघाडीच्या सभा होऊ नये म्हणून प्रयत्नरत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पहिल्या सभेपूर्वी तेथे हिंदु- मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण केला गेला, ही दंगल घडवणाऱ्या म्होरक्याला पकडण्याची गृहमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही मागणी केली. परंतु काही झाले नाही. त्यामुळे आमची सभा रोखण्यासाठी हा शासन पुरस्कृत प्रयत्न होता. नागपुरातही तिन्ही पक्षाकडून वज्रमुठ सभेची जय्यत तयारी सुरू आहे. सभेला लक्षावधी नागरिक जमण्याचा अंदाज आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही नागपुरातील आहे. त्यामुळे निश्चित गर्दीचा अंदाज बघता दोघांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या भितीपोटी भाजप वेगवेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून अडचणी आणत असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.