नागपूर : राज्यातील शहरांमध्ये बेकरी आणि तंदूर किचनमध्ये कोळसा व लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी बेकरी व तंदूर किचन चालकांना हरित इंधन वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे लज्जतदार तंदूर विकणाऱ्या रेस्टारंटवर संक्रात येण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर महापालिका शहरात राबवण्यात येत असलेले पर्यावरणविषयक प्रकल्प व उद्भवणारे प्रश्न यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गुरुवारी आढावा घेतला. मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षामध्ये आढावा बैठक पार पडली. बैठकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, बेकरी आणि तंदूर किचनमध्ये कोळसा, लाकूड वापरले जात असल्याने वायु प्रदूषण तर होतोच, पण अन्नपदार्थाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. बेकरीमध्ये धुरांडे असले तरी वायुप्रदूषण होत आहे. ते टाळण्यासाठी हरित इंधन वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

कदम यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भांडेवाडी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट दिली. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, शहरातील सांडपाणी व्यवस्था व त्याची शुद्धीकरण यंत्रणा आणि त्या संदर्भातल्या भविष्यातील उपाययोजना, शहरातील नियोजित पाणीपुरवठा वाहिनीचा कृती आराखडा, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचबरोबर शहरातील वायुप्रदूषणाचा प्रश्न या विषयांचा आढावा घेतला.

स्मशानभूमीच्या प्रदूषणावर लवकर धोरण

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत दहन घाटांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ धोरण तयार करणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागपूर महापालिकेला सहा वाहने (रोड स्विपिंग मशीन) उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. प्लास्टिकचा वापर प्रतिबंधित करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने समन्वयाने काम करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले.

सांडपाण्याला नदीपासून थांबवा मलजल सोडण्यात येत असल्याने नागनदी प्रदूषित झाली आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यापूर्वी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली पाहिजे. नदीत सांडपाणी सोडले जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. त्यासाठी लवकरात लवकर सिवेज ट्रिटमेंट प्लॉन्ट (एसटीपी) उभारण्याच्या कामाला गती देण्याची सूचना देण्यात आल्याचे कदम म्हणाले.