नागपूर : दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार दुधात भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी कडक कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या विरोधात एमपीडीए लावला जाईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिला.
धर्मराव आत्राम नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात दुधामध्ये किंवा दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले असताना त्या संदर्भातील तक्रारी येत आहेत. सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता दुधात भेसळ करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदा तयार करणार आहे. एवढेच नाही तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांना जामीन मिळू नये अशी कठोर तरतूद राज्य सरकार त्या कायद्यात करणार असून कायदा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या प्रस्तावित कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागासोबत डेअरी विभागाचे व पोलीस दलाचे अधिकारी संयुक्त पथकांमध्ये सहभागी केले जातील असेही आत्राम म्हणाले.
हेही वाचा : मामाने भाच्याला दुकान चालवायला दिले, त्याने डान्सबारवर १५ कोटी व प्रेयसीवर तब्बल दीड कोटी…
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात संघटन सक्षम करण्याच्या दृष्टीने कामाला लागली आहे. आम्ही महायुतीमध्ये राहून निवडणुका लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये किमान ९० जागा मिळाव्या अशी अपेक्षा आहे. विदर्भात आम्ही जास्तीत जास्त जागांची मागणी करणार आहोत. या जागा आम्हाला महायुतीला जिंकवण्यासाठी हव्या आहेत असेही आत्राम म्हणाले. लवकरच अजित पवार यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होणार असून त्यानिमित्ताने ते विदर्भातही येतील अशी माहिती आत्राम यांनी दिली. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेक करुन त्यांच्यावर हल्ला केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्यात लोकप्रतिनिधीवर हल्ला करणे योग्य नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार आहे हे जनता ठरवणार आहे. गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने महिला, युवक , शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. जनतेचा कौल मात्र महायुतीकडे असल्याचे आत्राम म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांबाबत केलेल्या विधानाकडे आम्ही लक्ष देत नाही. राऊत यांच्या वक्तव्याकडे त्यांचेच नेते लक्ष देत नाही. शिवाय महाविकास आघाडीचे नेते त्यांना गांभीर्याने घेत नसल्याचे आत्राम म्हणाले.