नागपूर: महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ (जाहिरात क्रमांक ०७०/२०२३). राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल व सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच यासाठी संमती पर्याय मागवण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी कुठली खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांचा पर्याय बदलण्याची संधी देण्यात आली आहे. उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
उपरोक्त विषयांकित परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.५६९/२०२४ प्रकरणी दिलेल्या १८ जून, २०२४ रोजीच्या निर्देशानुसार तीन संवर्गाची शिफारस यादी / तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांसाठी संमती विकल्प मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. संमती विकल्पाच्या आधारे राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र. ७ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. ७ सोबत जाहीर करण्यात येत आहे. तथापि उपरोक्त निकालामध्ये काही उमेदवारांची एकापेक्षा जास्त संवर्गासाठी निवड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यास्तव अशा उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती देत आहेत. याबाबत त्यांचे पुन्हा संमती विकल्प मागविण्यात येत आहेत. या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाइलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवाराचा विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल.
हेही वाचा – बँक खाते, एटीएमला तुम्ही जन्मतारीख पासवर्ड ठेवलाय का ? मग आत्ताच सावध व्हा; कारण….
संवर्गाचा पर्याय बदलण्यासाठी काय कराल
उमेदवारास संवर्गाचा विकल्प बदलण्यासाठी ‘स्विकारले’ हा पर्याय निवडावा लागेल. उर्वरित संवर्गासाठी उमेदवारास ‘गीव्ह ॲप १’ हा पर्याय निवडावा लागेल. ज्या संवर्गासाठी ‘गीव्ह ॲप १’ पर्याय निवडला आहे, त्या संवर्गाकरिता त्यांच्या उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेसाठी संमतीविकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ऑनलाईन फॅकल्टीज’ या मेनूमध्ये ‘कन्सेन्ट सबमिशन’ वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक ०५ ऑगस्ट ते ०६ ऑगस्टपर्यंत सुरू राहील.
हेही वाचा – नोकरीच्या आमिषाला बळी पडून ‘ती’ मध्यप्रदेशातून नागपुरात आली; मग जे घडले ते…
महत्त्वाच्या सूचना
- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार संमती विकल्प मागविण्यात येत असल्याने सदर संमती विकल्प ऑनलाईन पद्धतीने आयोगास सादर करणे अनिवार्य आहे.
- आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहीत ऑनलाईन पद्धतीने संमती विकल्प सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचा अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.
- संमती विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या मदत केंद्रावर संपर्क साधता येईल.