लोकसत्ता टीम
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध परीक्षांचे वेळापत्रक मागील दोन वर्षांत जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यातील बहूतांश परीक्षा अद्यापही झालेल्या नाहीत. या परीक्षा होणार की त्यांची थेट मुलाखत घेऊन निवड होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये होता. त्यावर आता उत्तर सापडले आहे. आयोगाने नुकतेच ३३ परीक्षांची यादी जाहीर केली आहे. या परीक्षांसाठी चाळणी परीक्षा होणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे उमदेवारांना परीक्षेची कसून तयारी करावी लागणार आहे. या परीक्षा कुठल्या आहेत त्याची सविस्तर माहती जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी चाळणी परीक्षा न घेता मुलाखतही घेतल्या जातात. कमी जागा असणाऱ्या आणि वर्ग दोन आणि वर्ग एकच्या पदांसाठी अनेकदा थेट मुलाखती होतात. मुलाखती घेऊन उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. परंतु, एका पदासाठी अधिकचे अर्ज आल्यास आयोग अशावेळी चाळणी परीक्षा घेण्यात येईल अशी सूचना जाहिरातीमध्ये देतो. त्यानुसार आयोगाने विविध प्रकारच्या ३३ पदांसाठी आता चाळणी परीक्षा घेतील जाणार हे जाहीर केले आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विकास विभाग या विभागातील विविध प्रकारच्या ३३ पदांचा समावेश आहे.
आणखी वाचा-महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…
अशी असेल परीक्षा…
वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि राज्य शासनाच्या सेवेत काम करण्याची संधी शोधत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. एमपीएससी अंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्याच्या वैद्यकीय विभागातील महत्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाशी संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध विषयांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गाखाली ही भरती होणार असून एकूण ४१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी अर्जप्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ही परीक्षा होणार आहे. या विभागातील ४१ विविध पदांसाठी परीक्षा होणार की मुलाखतीद्वारे निवड होणार असा प्रश्न होता. अखेर आता परीक्षा घेऊनच निवड केली जाईल असे आयोकडून जाहीर करण्यात आले आहे.