नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(एमपीएससी) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चे शुद्धिपत्रक जाहीर करून ज्या मराठा उमेदवारांनी अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज केला असेल त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातून (एसईबीसी) नव्याने अर्जाची मुभा दिली होती. त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून सुधारित अर्ज केला होता. मात्र, आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना हजारो मराठा उमेदवारांचे अर्ज हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच असल्याने मोठा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने यात सुधारणा न केल्यास मराठा उमेदवार आरक्षणाच्या लाभाला मुकण्याची दाट शक्यता आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याने भविष्यात मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे ‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रक काढून मराठा उमेदवारांनी खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’मधून अर्ज केला असल्यास त्यांना ‘एसईबीसी’ प्रवर्गातून नव्याने अर्जाची संधी दिली होती. त्यानुसार मराठा उमेदवारांनी नव्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला. परंतु, त्यानंतरही त्यांचा अर्ज हा आता ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच असल्याचे आयोगाच्या संकेतस्थळावर दाखवत आहे. यासाठी काही उमेदवारांनी ‘एमपीएससी’च्या सचिवांचीही भेट घेतली. मात्र, त्यानंतरही तोडगा न निघाल्याने या उमेदवारांचे भविष्य अंधरात जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या सचिव आणि अध्यक्षांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नेमका तांत्रिक गोंधळ काय?

एमपीएससीच्या शुद्धीपत्रकानंतर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी शेकडो मराठा उमेदवारांनी आपला अर्ज हा ‘एसईबीसी’ प्रवर्गातून केला. त्यांच्या अर्जाच्या छायांकित प्रतींवरून ते ‘एसईबीसी’ प्रवर्गात असल्याचे स्पष्ट होते. नुकताच पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज करत असताना त्यांचा अर्ज हा ‘एसईबीसी’ ऐवजी ‘ईडब्ल्यूएस’मध्ये दाखवत जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. असे झाल्यास त्यांना ‘एसईबीसी’ प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भविष्यातील धोका काय?

‘एमपीएससी’चा अभ्यासक्रम बदलण्याआधी नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची बहुपर्यायी राज्यसेवा परीक्षा आहे. मराठा उमेदवारांना ‘एसईबीसी’ हे १० टक्के आरक्षण लागू झाल्याने त्यांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षण घेता येणार नाही. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या पूर्व परीक्षेनंतर ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून ‘एसईबीसी’ उमेदवारांनी लाभ घेतला असा आक्षेप न्यायालयात करून त्यांना ‘ईडब्ल्यूएस’मधून बाहेर काढा असा दावा केला जाऊ शकतो.