बुलढाणा : सुसज्ज परीक्षा केंद्र, मोबाईल जॅमर, परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवणारे सीसीटीव्ही आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त असा उद्या रविवारी, दोन फेब्रुवारी रोजी आयोजित महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा थाट आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
उद्या रविवारी सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेदरम्यान एमपीएससीतर्फे महाराष्ट्र गट ब अराजपात्रित सेवा संयुक्त परीक्षा २०२४,परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे पाच हजार (४०८०)परीक्षार्थिंची नोंद करण्यात आली आहे. बुलढाणा शहरातील १५ केंद्रांवरून ही परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये चिखली मार्गावरील सहकार विद्या मंदिर, जिजामाता महाविद्यालय,सेंट जोसेफ कॉन्व्हेंट,शारदा ज्ञानपीठ, भारत विद्यालय, एडेड विद्यालय, पंकज लद्धड अभियंत्रिकी महाविद्यालय, शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, गुरुकुल ज्ञानपीठ, शिवसाई युनिव्हर्सल कनिष्ठ महाविद्यालय, उर्दू हायस्कूल, बुलढाणा केंब्रिज स्कूल, या केंद्राचा समावेश आहे. सहकारमध्ये दोन केंद्र राहणार आहेत. जिजामाता महा विद्यालयात दिव्यांग उमेदवारांचे केंद्र राहणार आहे.
या परीक्षेसाठी पावणेचारशे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये १५ केंद्र प्रमुख, ३० केंद्र लिपिक, ६५ पर्यवेक्षक, दोनशे समावेशक, ३० शिपाई, १५ काळजी वाहक, १५ पाणी वाहक यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.