लोकसत्ता टीम
नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून आलेल्या दबावात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अखेर २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली. राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या २ लाख २५ हजार उमेदवारांमध्ये जवळपास ५ हजारांवर उमेदवार हे ‘आयबीपीएस’ची परीक्षा देणारे असतात. तर कृषी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे दोन दिवसांआधीच आयोगाने जाहीर केले होते. असे असतानाही काही हजारांसाठी लाखो उमेदवारांना वेठीस धरल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
‘एमपीएससी’तर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार होती. कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करावा, तसेच ‘आयबीपीएस’ आणि ‘एमपीएससी’ परीक्षा एकाच दिवशी आल्याने २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे येथे आंदोलन केले. मात्र, तब्बल चौथ्यांदा परीक्षा रद्द झाल्याने राज्यसेवा परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होत असल्याची ओरड आहे.
आणखी वाचा-लाचखोरीविरुद्ध लावलेली भीत्तीपत्रके फाडणाऱ्या कार्यालयातच ६० हजारांची लाच…
दर आठवड्यात असते ‘आयबीपीएस’ परीक्षा
इस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे (आयबीपीएस) बँक लिपिक पदांसाठी २४, २५ आणि ३१ ऑगस्ट अशा तीन तारखांना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा होणार आहे. ‘आयबीपीएस’चे वेळापत्रक तपासले असता त्यांच्या दर महिन्यात परीक्षा असतात. ऑगस्ट महिन्यात ३, ४, १०, १७ आणि १८ या तारखांनाही ‘आयबीपीएस’च्या परीक्षा होत्या. शिवाय ‘आयबीपीएस’च्या परीक्षा या विविध सत्रात घेतली जाते. आयोगातील काही तज्ञांच्या मते, ‘आयबीपीएस’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फारच कमी असते. अभियांत्रिकीचे काही उमेदवार ही परीक्षा देतात. असे असतानाही काही हजार विद्यार्थ्यांसाठी ऐन तोंडावर आलेली परीक्षा रद्द झाल्याने उमेदवार नाराज आहेत.
आणखी वाचा-राज्यातील शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समिती कागदोपत्रीच; अडीच वर्षांपासून…
परीक्षा या तारखेला होण्याची शक्यता
कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश राज्यसेवा परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने २५ ऑगस्टच्या परीक्षेत या पदांचा समावेश करणे शक्य नाही, असे पत्रक आयोगाने २० ऑगस्टलाच जाहीर केले होते. आता परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाकडे मागणीपत्र आल्यावर राज्यसेवा परीक्षेमध्ये कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश केला जाईल. त्यानंतर पुन्हा नवीन जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्जासाठी किमान एका महिन्याचा अवधी दिला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर परीक्षेसाठी ऑक्टोबर महिना उजाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.